गणेशोत्सव विशेष लेखमाला
नाशिक श्रीगणेश
शास्त्रीय संगीताची
१३२ वर्षांची परंपरा जपणारे
मेनरोडवरील श्री गणपती मंदिर
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आयोजित गणेशोत्सव विशेष लेखमालेत आज मेनरोड वरील श्री गणेश भक्त मंडळी ट्रस्टच्या श्री गणपती मंदिराचा परिचय करून घेणार आहोत. नाशिकची सगळ्यात जुनी आणि सुप्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे मेनरोड. सदैव माणसांच्या गर्दीने गजबजलेल्या या मेनरोड वर दुकानांच्या रांगेत एक अतिशय प्राचीन आणि अतिशय आगळे वेगळे गणपती मंदिर आहे.
श्री गणेश भक्त मंडळी ट्रस्टचे हे गणपती मंदिर आहे. मंदिराच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश करताच शांत आल्हाददायक वातावरणात आल्याचा सुखद अनुभव येतो. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचं हे मंदिर लाकडी बांधणीचे आहे. मंदिर दुमजली असून मध्ये चौक आहे.समोर लाकडी गाभारा कम देव्हारा आहे यात कलेचा दाता श्री गजानन भक्तांवर कृपाशिर्वाद देत आहे. शके १८१३ म्हणजे इ.स. १८९१ च्या वैशाख शुद्ध त्रयोदशीला या मंदिराची स्थापन झाल्याचे मंदिराच्या दर्शनी बोेर्डवरच लिहिलेले आहे. इ.स. १८९१ साली कै.दामोदर डोंगरे आणि कुलकर्णी यांनी या गणपती मंदिराची स्थापन केली आहे.
मेनरोड वरील या गणपती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात शास्त्रीय संगीताची परंपरा आहे. गेल्या १३२ वर्षांत या मंदिरांत भारतातील शास्त्रीय संगीताचे दिग्गज गायक वादक येऊन हजेरी लावून गेले आहेत. तसेच शास्त्रीय संगीताचे शेकडो नवीन गायक संगीतकार तयार झाले आहेत. हजारो गायकांना आपली कला सादर करण्याची संधी या मंदिरात मिळाली आहे,मिळते आहे. कारण दर गुरूवारी येथे शास्त्रीय संगीताची मैफल जमते.
श्री गणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवात पाच दिवस आणि माघी जन्मोत्सवानिमित्त पाच दिवस विशेष संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी मेनरोड येथील पुरातन गणपती मंदिरात १३२ वा भाद्रपद उत्सव करण्यात आला. यावेळी डॉ. विजय मालपाठक,कन्या गुणे व शंतनू गुणे, साक्षी भालेराव , अथर्व ठाकूर यांचे शास्त्रीय गायन झाले. मल्हार चिटणीस व यश मालपाठक यांचे तबला वादन तर विनायक आमडेकर यांच्या बासरीवादनने कार्यक्रमात रंगत आणली. श्री सुहास काळे मंदिराचे पुजारी आहेत. या गणपतीची दररोज षोडशोपचार पूजा केली जाते. विनायक व संकष्टी चतुर्थी तसेच एकादशी या दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
श्री गणेश भक्त मंडळी ट्रस्ट च्या अध्यक्ष अडव्होकेट सौ.उज्वला दीक्षित तर सचिव श्री पुष्कराज कुलकर्णी आहेत. शास्त्रीय संगीताची परंपरा १३२ वर्षांपासून सुरू ठेवणारे मेनरोड वरचे गणपती मंदिर ही नाशिकची शान आहे, मान आहे.
बघा हा व्हिडिओ
Ganeshotsav Special Article Nashik Main road Ganpati by Vijay Golesar