नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. उपनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. संशयित आरोपी पीडितेच्या घरा शेजारीच राहतो. पीडिता घरात एकटी असल्याचा फायदा घेत संशयिताने तिच्या राहत्या घरात प्रवेश केला. त्यानंतर पिडीतेच्या मनाविरुद्ध तिचा हात पकडत तिला खेचत त्याच्या घरी नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या पालकांना हा सर्व प्रकार समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा शोध सुरू आहे.
महिलेचे मंगळसूत्र लांबवले
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील लाखाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना वर्दळीच्या कॉलेजरोड भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या राघवेंद्र अंकलगी (६६ रा.आनंदवन कॉलनी,कॉलेजरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अंकलगी या सोमवारी (दि.५) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. अकराच्या सुमारास त्या परिसरातील सोनी डिझायनर स्टुडिओ समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Nashik Crime Minor Girl Rape Police Case Chain Snatching Women