नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे वाटत असतानाच आता आफ्रिकेमध्ये विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार भारतात येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून दि.1 डिसेंबरपासून ती लागू होणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 14 दिवसांचा प्रवास हिस्ट्री आणि RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल एअर फॅसिलिटी पोर्टवर अपलोड करावा लागेल. तसेच जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोरोनाची चाचणी केली जाईल आणि तेथेच त्यांना अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. 8 व्या दिवशी दुसरी चाचणी होईल आणि निगेटिव्ह आढळल्यास पुढील 7 दिवस स्वत: ची देखरेख करावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त इंग्लड (युनायटेड किंगडम ), ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या युरोपीय देशांना जोखीम देशांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या देशांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे आधीच नोंदवली गेली आहेत. या 12 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची भारतातही कोरोना चाचणी केली जाईल आणि त्यांना क्वारंटाईनही केले जाईल.
जगातील अनेक देशांनी कोरोना विषाणूचे नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ आढळून आल्यावर प्रवासी निर्बंध जाहीर केले आहेत. केंद्र सरकारने सांगितले की, नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेणार आहेत. तसेच केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविड-19 चाचणी वाढवण्याचे, आणि आरोग्य सेवा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आणि जीनोम अनुक्रम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतरच केंद्र व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या प्रभावी तारखेबाबत निर्णय घेईल. यापुर्वी सरकारने 15 डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
गृह मंत्रालयाने आणखी स्पष्ट केले की, सरकारने येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी आणि देखरेख करण्याच्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: ज्या देशांना ‘जोखीम’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्या संदर्भात आपल्या देशातील विमानतळ व बंदरांवर चाचणी प्रोटोकॉलचे कठोर पालन निश्चित करण्यासाठी विमानतळ आरोग्य अधिकारी आणि बंदर आरोग्य अधिकारी यांना सतर्क करण्यात येत आहे.