ठाणे – तिकडे दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा अवतार आल्याने जगभरात एकच दहशत निर्माण झाली आहे. सर्व देशांनी सतर्कता बाळगून नियमांची नव्याने अंमलबजावणी सुरू केली आहे. इतर देशांप्रमाणे भारतही सतर्क झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. ओमिक्रॉनशी लढण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्याची भीती होती तेच झाले. दक्षिण अफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे. परंतु ती ओमिक्रॉनबाधित आहे की नाही हे अद्याप समजू शकले नाही.
दक्षिण अफ्रिकेतून ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीला परतलेला एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे किंवा नाही हे अद्याप कळू शकले नाही. व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकार्याने दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती २४ नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेमधील केपटाऊन येथून डोंबविलीला परतली होती. त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. केडीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या, दक्षिण अफ्रिकेतून परतल्यानंतर संबंधित व्यक्ती कोणाच्याही संपर्कात आलेली नाही. तत्पूर्वी ती व्यक्ती दक्षिण अफ्रिकेतून दिल्ली येथे आली होती.
पानपाटील म्हणाल्या, संक्रमित आढळलेल्या व्यक्तीने आधी दक्षिण अफ्रिकेतून दिल्ली आणि दिल्ली येथून मुंबईपर्यंत प्रवास केला होता. त्या व्यक्तीच्या भावाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी आज होणार आहे. संबंधित रुग्णाला सध्या केडीएमसीच्या आर्ट गॅलरीच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. केडीएमसी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आम्ही नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सज्ज आहोत.
दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगासह भारतात खळबळ उडाली आहे. बंगळुरूमध्ये दोन दक्षिण अफ्रिकी नागरिक कोरोनाबाधित आढळले होते. दोन्ही व्यक्ती ओमिक्रॉन बाधित नसून, डेल्टा व्हेरिएंटबाधित आढळल्याचे दिलासादायक वृत्त आहे. बंगळुरू येथील अधिकार्यांच्या माहितीनुसार, दोघांनाही डेल्डा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी एक ११ आणि दुसरा २० नोव्हेंबरला बाधित आढळला होता. त्यामुळे दहशत निर्माण झाली होती.
अफ्रिकेतून आलेल्या ८७ जणांचा शोध सुरू
दक्षिण अफ्रिकेतून मुंबईमध्ये एकूण ८७ जण आले आहेत. या सर्वांचे ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. डोबविलीतील दोघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांमध्ये ओमिक्रॉनची लक्षण आहेत की नाही हे अद्याप समजलेले नाही. तसेच, ओमिक्रॉनची टेस्ट अद्याप बाकी असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे. अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. कोविड सेंटर सज्ज असले तरी ते पुन्हा कार्यन्वित करावे लागतील. सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाईल. निम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.