नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे होरपळणार्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच रुपये प्रतिलिटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ही घट होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. १ डिसेंबर रोजीच्या आढाव्यात सिलिंडरच्या किमती कमी होण्याची जवळपास शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्याचा हा परिणाम आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे ओमिक्रॉन हे नवे रूप जास्त संक्रामक असल्याच्या वृत्तामुळे संपूर्ण जगात सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळे जगातील बहुतांश देश हवाई प्रवासावर निर्बंध घालण्यासह लाॉकडाउनचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती एका दिवसात जवळपास १२ टक्क्यानी घसरून ७२ डॉलर प्रतिपिंपपर्यंत खाली आल्या आहेत.
आगामी काळात ओमिक्रॉनचा धोका वाढला तर जगातील सर्वच देश कठोर निर्बंध वाढवतील. याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या मागणीवर होऊन त्या कमी होतील. जगातील प्रमुख देशांनी दबाव वाढविल्यानंतर दोन डिसेंबर रोजी होणार्या ओपेक देशांच्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यावर निर्णय होऊ शकतो. कच्च्या तेलाचा पुरवठा वाढून मागणी कमी झाल्यास त्याच्या किमती आपोआप कमी होतील. कच्च्या तेलाच्या किमती ७२ डॉलर प्रतिपिंप असा दर जरी राहिला तरी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर पाच रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दहा टक्क्यांची घट झाली आहे. पण स्थानिक बाजारात दर इतके कमी होण्याची शक्यता नाहीय. तरीही कंपन्यांकडून आगामी १५ दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर पाच ते सात टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. जर पाच टक्क्यांपर्यंत दर खाली आहे तर दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये प्रतिलिटर आहे. ते आणखी पाच रुपयांनी सहज कमी होऊ शकते.
कच्च्या तेलाशी संबंधित तज्ज्ञ सांगतात, स्थानिक बाजारात किरकोळ किंमत १५ दिवसांच्या रोलिंग सरासरीच्या आधारावर निश्चित केली जाते. म्हणजेच कच्चे तेल खरेदी केल्यानंतर ते शुद्धीकरण केंद्रात स्वच्छ होऊन पेट्रोल आणि डिझेलच्या स्वरूपात बाजारात येण्यासाठी १५ दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती घटल्याचा फायदा काही दिवसांनंतर मिळणार आहे. अमेरिका, जापान आणि दक्षिण कोरियासह भारतासारख्या या देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याच्या सामुहिक प्रयत्नांतर्गत त्यांचे आपत्कालीन भांडार खुले करून दिले आहेत. या घोषणेचा परिणाम अद्याप दिसून आला नाही. आगामी काळात झाल्यास दिलासा मिळू शकतो.