नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सोमवारी (दि.५) वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या एका डॉक्टरसह वृध्दाने आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचबन येथील धात्रक संकुल मध्ये राहणाºया डॉ. निलेश पोपटराव छाजेड (४८) यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास कुटूंबियांनी त्यांना तात्काळ परिसरातील सुयोग हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना दुपारी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.
दुसरी घटना लहवित ता.जि.नाशिक येथे घडली. दशरथ सुखदेव मुठाळ (६२) यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ दे.कॅम्प येथील संत कृपा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.मनिष बोथरा यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.
दारुच्या नशेत पडल्याने मृत्यू
दारूच्या नशेत पडल्याने ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ही घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन किशोर मांजरे (रा.प्रबुध्द नगर, सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मांजरे यांना दारूचे व्यसन होते. गुरूवारी (दि.१) रात्री ते दारूच्या नशेत पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. मित्र मनोज साळवे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
नदी किनारी मृत्यू
मासेमारी करण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरूणाचा नदी किनारी मृत्यू झाला. माडसांगवी शिवारात घडलेल्या या घटनेत सदर तरूण बेशुध्द अवस्थेत मिळून आला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद कुमार (रा.माडसांगवी) असे मृत युवकाचे नाव आहे. अरविंद कुमार सोमवारी (दि.५) मासेमारी करण्यासाठी गावातील गोदावरी नदी पात्रात गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो नदी किनारी बेशुध्द अवस्थेत मिळून आला. कुटूंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
Nashik Crime Suicide Accidental Death Police Case