पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खुद्द आरोग्यमंत्र्यांनाच हाफकिनविषयी माहिती नसल्याचे समोर आल्याने राज्यभर त्यांच्या अज्ञानाविषयी चर्चा रंगली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हाफकीनवर बंदी टाकायला सांगत होते. तो माणूस नसून संस्था आहे, असं त्यांच्या पीएने सांगितले आणि यातून मंत्र्यांचं अज्ञान समोर आलं.
एखाद्याच्या स्वभावावर हाफकिनही लस शोधू शकत नाही, असं म्हणलं जातं. शिंदे सरकारच्या आरोग्यमंत्र्यांचंही तसंच झालं आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अज्ञानावरही आता हेच म्हणायची वेळ आली आहे. हाफकीनही यांच्या अज्ञानावर लस शोधू शकले नसते. पुण्यातील ससून रुग्णालयात काल आरोग्य मंत्र्यांचं अज्ञान पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर उघडकीस आले आहे. एका वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीत हा किस्सा सांगण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल भेट दिल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना काही सूचना दिल्या.
औषधांचा तुटवडा पडत असल्याने तुम्ही ज्या हाफकिन माणसाकडून औषध घेत आहात ते आधी बंद करा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना झापलं आहे. ज्यावेळी आरोग्य मंत्री तिथल्या अधिकाऱ्यांना ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या त्यांच्या पीएनी त्यांच्या कानात हाफकिन ही संस्था असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी तिथून पळ काढला अशी बातमी छापून आली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या अज्ञानाची सगळीकडे चर्चा आहे.
यांच्या अज्ञानावर कुणी लस शोधेल का लस, कारण आरोग्यमंत्र्यांना हाफकिन माहित नाही, हाफकिन यांच्या अज्ञानावर लस शोधायला तुम्ही पुन्हा जन्माला या, असंच म्हणावं लागेल अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून शिंदे गटातील अनेक आमदारांचे किस्से उघडकीस येत आहेत.
कोण होते हाफकिन?
हाफकीन नावाची एक संस्था मुंबईत आहे. हाफकीन आडनाव असलेल्या एका शास्त्रज्ञाच्या नावावर या संस्थेला हे नाव देण्यात आले आहे. वाल्डमेर मोर्डेकई हाफकिन यांनी प्लेग आणि कॉलरा या आजारांवर लस शोधून काढली. मुंबईत त्यांचं संशोधन आणि वास्तव्य मुंबई ग्रँड हॉस्पिटलला होतं, त्यांची येथे प्रयोगशाळा होती, ते मुंबईत १८९६ मध्ये आले होते. १९२५ साली या संस्थेचं नाव बदलून हाफकिन इन्स्टीट्यूट करण्यात आलं.
साहेब, हाफकिनला आणायचं कुठून?
हाफकिन संस्थेकडे कोणतीही औषधं, जी सरकारी रुग्णालयात लागतात, ती खरेदी करण्याची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच ही औषधं सरकारी रुग्णालयात उपलब्ध होतात. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ज्या हाफकीन माणसाकडून औषध नाकारायचं आहे त्यांचा मृत्यू १९३० सालीच झाला आहे.
Health Minister Tanaji Sawant Controversial Statement