मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. हा मेळावा शिवतीर्थवर करण्यावर शिवसेना ठाम आहे. या मेळाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मत व्यक्त करताच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला पुन्हा खोके सरकार म्हणून हिणवले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहे. आता हे आरोप – प्रत्यारोप दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन सुरु आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. त्यामुळे शिवतीर्थवरच दसऱ्याचा कार्यक्रम होणार, तिथे खोके सरकार येऊ शकणार नाही असे विधान आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या सम्राट या मंडळातील बाप्पाच्या दर्शनाला आल्यावर केले आहे.
दसरा मेळाव्यावरुन आरपीआयचे रामदास आठवले यांनी शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यावरुन बीबीसी मैदानाचा पर्याय सांगितला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी इतरांना दसरा मेळाव्यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला असे म्हणत त्यांना फटकारले आहे. तर महाराष्ट्राची आणि शिवसेनेची संस्कृती ही शिवतीर्थावरच दसरा मेळाव्याची आहे. त्यामुळे ही परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच आरोग्य मंत्र्यांना हाफकीन ही एक संस्था आहे की दलाल हे देखील माहिती नाही. यावरुन शिंदे सरकारमधील मंत्री कसा कारभार करीत असतील असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर दुसऱ्या एका मंत्र्याने पद घेतले आहे, बंगलाही घेतला आहे पण प्रत्यक्षात कामाला आणखी सुरुवातच केलेली नाही. हा सर्व भोंगळ कारभार असून तो जनतेला देखील न पटणारा असल्याचे ते म्हणाले आहेत.
“दसरा मेळाव्यावरुन राजकारण सुरु आहे आणि याचा त्रास अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबईच्या विकासामध्ये योगदान दिले असे अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जात आहेत. यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना खोके सरकारमधून दिवसाला एक पत्र दिले जात आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण सेना मागे सरकणार नाही”, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Yuva Sena Chief Aditya Thackeray on Dasara Melava Politics Shivsena