नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील प्रथम व जास्त कालावधी असलेला हिंदी सदाबहार गीतांचा नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन 2022 चे आयोजन नाशकात करण्यात आले आहे. विश्वास ग्रृप व गीतगुंजन प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी विश्वास गार्डन, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे शुभहस्ते व विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर म्युझिकल मॅरेथॉनमध्ये नाशिकमधील नव्या-जुन्या पिढीतील 60 हून अधिक गायक-कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एकूण 126 गाणी सादर होणार आहेत. गाणी एकत्रितपणे व सलग न सादर होता, ती सहा वेगवेगळ्या थीमवर आधारीत असणार आहे.
यामध्ये सकाळी 9 ते 11 अनमोल रतन, सकाळी 11 ते 1 जीना यहॉ मरना यहाँ, दुपारी 1 ते 3 हिटस् ऑफ 90, दु. 3 ते 5 दर्द ए किशोर, सायं 5 ते 7 फिल्मी गझल, संध्या 7 ते 10 हिटस् ऑफ आर.डी. बर्मन या क्रमाने होणार आहेत. गीतगुंजन म्युझिकल परिवार, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
नाशिकमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवोदित गायक कलावंत यांचा एकत्रित संगम एका व्यासपीठावर व्हावा, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संगीत शौकीनांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख श्री. विश्वास ठाकूर व गीतगुंजन म्युझिकल नाईट परिवाराचे श्री. भुषण कापडणे, प्रिया कापडणे यांनी केले आहे.
India’s First Non Stop Musical Marathon Will be in Nashik