इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता अक्षय कुमार याचे एक वक्तव्य सध्या खुपच गाजते आहे. खासकरुन त्याने त्याच्या सिनेमांविषयी ते केले आहे. सध्या बॉलिवूड एका वेगळ्याच संकटातून जात आहे. कारण, गेल्या काही दिवसात रिलीज झालेले सिनेमे फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर अक्षयचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
‘द कपिल शर्मा शो’ हा सर्वांचा आवडता कार्यक्रम. कपिल शर्मासह यातील इतर कलाकार प्रेक्षकांना तुफान हसवतात. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी येत असतात. त्यांच्याशी होणाऱ्या संवादात हास्यनिर्मिती होत असते. मध्यंतरी बंद असलेला हा शो पुन्हा सुरू होतो आहे. प्रेक्षकांनी देखील मध्यंतरी या शो ला खूप मिस केले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागातच अक्षय कुमारने एन्ट्री केली आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट कठपुतली चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी अक्षय या ‘शो’मध्ये आला आहे. आपले चित्रपट हे कपिल शर्मामुळे फ्लॉप होत असल्याचा आरोप अक्षय कुमारने या कार्यक्रमात केला.
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यात अक्षय कुमार आपल्या पुढील चित्रपट ‘कठपुतली’च्या प्रमोशनसाठी आला आहे. या शोचा पहिल्या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे, प्रोमोमध्ये कपिल शर्मा अक्षय कुमार आणि रकुलप्रीत सिंगचे स्टेजवर स्वागत करत आहे. ‘पाजी, तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष लहान कसे होता?,’ असं कपिल अक्षयला म्हणतो. पण कपिलचं हे वाक्य ऐकून अक्षय चिडतो आणि म्हणतो, ‘हा माणूस माझ्या सगळ्या गोष्टींना दृष्ट लावतो, माझे पैसे, माझे चित्रपट सर्वांना याची दृष्ट लागली. आता माझा कोणताच चित्रपट चालत नाही….’
अक्षयचं हे बोलणं ऐकताच कपिल शर्मा आणि प्रेक्षक हसायला लागतात. अर्थात हा सगळा गमतीचा भाग. पण अक्षयचे सिनेमे लागोपाठ फ्लॉप होत आहेत. ‘बच्चन पांडे’ आपटला. पाठोपाठ आलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ही दणकून आपटला आणि यानंतरचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला. आता अक्षयला कुणाची नजर लागली माहित नाही. पण फ्लॉप सिनेमांची चिंता त्यालाही सतावते आहे. हे त्याच्या बोलण्यातून जाणवत आहे. असे असले तरी ‘कठपुतली’ या चित्रपटाच्या बाबतीत अक्षय खूप आशादायी आहे.
‘द कपिल शर्मा शो’ येत्या १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी आणि भारती सिंग या शोमध्ये दिसणार नाहीत. कृष्णा आणि सुदेश लाहिरी काही कारणांमुळे शोमधून बाहेर पडले आहेत. तर भारती दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ‘कपिल शर्मा शो’मध्ये यावेळी काही नवे चेहरे दिसणार आहेत. यात सृष्टी रोडे, गौरव दुबे आणि सिद्धार्थ सागर यांचा समावेश असल्याचे समजते.
Bollywood Actor Akshay Kumar On His Cinema In TV Show