नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज येवला दौऱ्यावर आहेत. ते आज नाशिकहून येवल्याच्या दिशेने निघाले असता त्यांना चांदोरी येथील गार्गी आहेर या चिमुकलीचा वाढदिवस असल्याची माहिती मिळाली. यावेळी छगन भुजबळ यांनी चांदोरी येथे आपल्या गाड्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला थांबवत गार्गी आहेर या चिमुकलीचे अभिष्टचिंतन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी गार्गी आहेर या चिमुकलीचा शेतात फिरताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा हातात असलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे राज्यभरात गार्गी आहेर हिची चर्चा होती. तिचा हा फोटो महाराष्ट्रात नेहमीच फिरत असतो. या चिमुकलीने सर्व सामान्य पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यांना प्रभावित केले आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली शरद पवार यांची चाहती आहे. आज तिचा सहावा वाढदिवस असल्याची माहिती छगन भुजबळ यांना मिळाली. त्यांनी आज नाशिकहून येवल्याच्या दिशेने जात असताना आपल्या वाहनांचा ताफा थांबवून तिचे अभिष्टचिंतन करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Chhagan Bhujbal Suddenly Wish Small Girl in Chandori