बसमध्ये चढतांना ८२ वर्षीय वृध्द महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने सीबीएस बसस्थानकात बसमध्ये चढतांना ८२ वर्षीय वृध्द महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली. इंदूबाई निवृत्ती काकड (रा.कोथरूड पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकड या मंगळवारी (दि.६) शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या सिन्नर येथे जाण्यासाठी सीबीएस बसस्थानकात आल्या असता ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे साठ हजार रूपये किमतीची व अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार शेटे करीत आहेत.
विद्यार्थीनीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात रस्त्याने फोनवर बोलत जाणा-या विद्यार्थीनीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. सुविधा मनिष भंडारे (१६ मुळ रा.मनमाड,हल्ली सौभाग्यनगर,गंगापूररोड) या युवतीने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुविधा भंडारे ही विद्यार्थीनी मंगळवारी (दि.६) शिकवणीसाठी कॉलेजरोड भागात पायी जात असतांना ही घटना घडली. फोनवर बोलत ती रस्त्याने पायी जात असतांना क्रोमा शोरूम भागातील मालवण हॉटेल समोर पाठीमागून मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने तिच्या हातातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.