नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळय़ा ठिकाणी शहर व परिसरात मंगळवारी झालेल्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात छोटा हत्ती आणि अज्ञात वाहनचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पहिला अपघात विहीतगाव रोड भागात झाला. कृष्णा आशुतोष दुबे (१६ रा.जयभवानी रोड) हा युवक मंगळवारी आपल्या दुचाकीवर विहीतगाव रोडने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. केंद्रीय विद्यालयात शाळेत गेलेल्या लहान भावास घेण्यासाठी तो जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने स्थानिकांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपघात व मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे व जमादार माळोदे करीत आहेत. दुसरा अपघात खर्जुलमळा परिसरात झाला. जेलरोड भागातील अभिषेक रमेश परदेशी (२९ रा.गणनाथ हौ.सोसा.सह्याद्री कॉलनी,कॅनलरोड) मंगळवारी टाकळीकडून नारायणबापू चौकाच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हावर एमएच १५ एचव्ही २३९२ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. खर्जुलमळा परिसरात समोरून भरदाव येणा-या छोटा हत्ती एमएच १५ सीके २२४८ टेम्पोने दुचाकीस धडक दिली. या अपघातात परदेशी याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून टेम्पो चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे.