नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेजारी भाडेकरू कुंटुंबियांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या शेजा-याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याने तो जखमी झाला आहे. शुभम मधुकर रोकडे (रा.साईदर्शन सोसा.म्हाडा बिल्डींग,सिन्नरफाटा) असे शेजा-याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारणा-या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी रविंद्र दशरथ घुगे (रा.सदर) यांनी तक्रार दाखल केली असून जखमीच्या जबाबावरून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुगे आणि रोकडे कुटुंबिय एकाच इमारतीत वास्तव्यास असून रोकडे हे भाडेकरू आहेत. भाडे तत्वावर राहणा-या रोकडे कुटुंबियात नेहमीच कौटुंबिक वादातून वाद होतात. रविवारी (दि.४) सकाळच्या सुमारास या कुटुंबियात वाद सुरू असतांना घुगे वाद मिटविण्यासाठी गेले असता ही घटना घडली. रोकडे कुटुंबियात मोठमोठ्याने आरडाओरड झाल्याने सोसायटीतील रहिवाशी धावून गेले होते.
यावेळी घुगे आणि त्यांच्या पत्नीही रोकडे कुटुंबियांच्या घरात गेले होते. रोकडे परिवारातील भांडणात आई वडिलांची समजूत काढून संशयित मुलास व त्याच्या मावस भावास सोसायटीच्या पार्किंगमध्ये रहिवाश्यांनी आणले असता संशयितांनी तुम्ही आमच्या भांडणात पडू नका असा सल्ला देत सर्वांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त झालेल्या दोघा भावांनी काही रहिवाश्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली असता घुगे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता शुभमने जवळच पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात हाणला. या घटनेत रोकडे जखमी झाले असून त्यांच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.