नाशिक : मखमलाबाद रोडवरील धनदाई लॉन्स भागात गप्पा मारत उभ्या असलेल्या तिघा मित्रांना गाठून दुचाकीस्वार त्रिकुटाने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना घडली. या घटनेत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत भामट्या लुटारूंनी दोघांच्या खिशातील रोकडसह मोबाईल बळजबरी काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तू अशोक झाडे (२२ रा.यशवंतनगर,सटाणा) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. झाडे हा अन्य दोन मित्रासमवेत सोमवारी (दि.२६) रात्री धनदाई लॉन्स भागात रस्त्यावर गप्पा मारत असतांना ही घटना घडली. एमएच १५ डीएक्स ९५७२ या दुचाकीवर आलेल्या तिन जणांच्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना तिघा मित्रांना गाठत दमदाटी करीत शिवीगाळ केली. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास तुम्हाला बघून घेवून अशी धमकी देत तिघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत दोघांच्या खिशातील एक हजार ७०० रूपयांची रोकड व दोन महागडे मोबाईल काढून घेत दुचाकीस्वार त्रिकुटाने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक डी.एस.पाटील करीत आहेत.