नाशिक : गंगापूर शिवारातील ध्रुवनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे दहा लाख रूपये किमतीचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी चावी चोरून हे धाडसी कृत्य केले आहे. या घरफोडीची तक्रार मिरा शशिकांत गंभीरे (रा.श्री बालाजी पॅराडाईज,मोतीवाला कॉलेज मागे) यांनी दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीरे कुटुंबिय शनिवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. घरफोडीपूर्वी चोरट्यांनी गंभीरे यांच्या घराची एक चावी चोरी करून हे धाडसी कृत्य केले आहे. गंभीरे कुटुंबिय घराबाहेर पडताच अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप उघडून बेडरूममधील कपाटातून सुमारे १० लाख ४७ हजार ९०० रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. त्यात तीन सोन्याचे मंगळसुत्र,अंगठी,सोनसाखळी,बांगड्या,तीन कानातील जोड व नथ आदी अलंकारांचा समावेश आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.