नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात जुन्या भांडणाची कुरापत काढत तीन जणांच्या टोळक्याने तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत तरूणाच्या डोक्यात, छातीवर आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राक्या उर्फ राकेश देवरे, कृष्णा राजपूत व सनी फडोळ अशी युवकावर प्राणघातक हल्ला करणा-या संशयित त्रिकुटाचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत अशोक मोरे (२२ रा. स्वराज्यनगर,पाथर्डी फाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मोरे गुरूवारी (दि.१६) रात्री परिसरातील ओमसाई रो हाऊस समोरील मोकळय़ा जागेत फेरफटका मारण्यासाठी गेला असता ही घटना घडली.
संशयितांनी त्यास गाठून जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ व दमदाटी करीत त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्यातील एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला असून या घटनेत डोक्यात, छातीवर व हातावर वार करण्यात आल्याने मोरे गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.