नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद रस्त्यावील नांदूरनाका येथे झालेल्या बसच्या भीषण अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. तेथील पाहणी केल्यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. याठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस त्यांनी केली. तसेच, उपचार योग्य पद्धतीने व्हावेत, यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अपघात का आणि कसा झाला हे जाणून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये याची दखल शासनाने घेतलेली आहे. घटनास्थळावरील ब्लॅक स्पॉट पाहणी केली असून यामध्ये कुणाची चूक आहे, याबाबत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नाशिक शहरातील अशा प्रकारचे जे काही ब्लॅक स्पॉट (वारंवार अपघात होणारी ठिकाणे) आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील काळात योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काळजी करू नका, घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला. नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज शासकीय रूग्णालयात दाखल प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली, त्याप्रसंगी धीर देताना ते बोलत होते.
यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सुहास कांदे, मुफ्ती मोहम्मद, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार रचना पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, डॉ.आवेश पलोड, आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत शासन आहे. जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अगोदर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटना स्थळास भेट दिली.
ही टीम देतेय उपचार
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांच्यासह चार अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक. शल्य चिकित्सक डॉ.भामरे यांच्या नियंत्रणाखाली 3 शल्य चिकित्सक डॉक्टरांचे पथक, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार त्यांच्या नियंत्रणाखाली 2 भूलतज्ज्ञ, 2 न्यायवैदिक तज्ज्ञ, 4 अपघात वैद्यकीय अधिकारी असे एकूण 19 वैद्यकीय पथकासह आपत्कालीन कक्षाच्या सर्व अधिकारी, कक्षाच्या मेट्रन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून एका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे. या बस अपघातात 12 मृत्यू, चार घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत. पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण, सुविधा हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा रुग्णालयात एकूण 31 जखमी प्रवासी उपचार घेत आहेत.
#नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका येथे बसला झालेल्या दुर्दैवी भीषण अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला तर जखमींवर उपचार सूरु आहेत. या घटनेची तातडीने दखल घेऊन नाशिक येथील दुर्घटनास्थळाला भेट देत प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून अपघाताबाबत विस्तृत आढावा घेतला. pic.twitter.com/OeQxl0iGn1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 8, 2022
Nashik Bus Fire Accident CM Visit Decisions
Eknath Shinde Private Bus Travel