जळगाव – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते एकनाथ खडसे भाजप नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि खडसे यांच्यादरम्यान शाब्दिक युद्ध सुरूच आहे. आता खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून मला बदनाम करण्यात आले. माझा छळ करण्यात आला. ते कोण आहे माहिती आहे का? टरबूज ऑफ महाराष्ट्र हे गुगलवर सर्च करा, अशा शब्दात खडसे यांनी फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि खडसे यांच्या टीका-टिप्पणी सुरू आहे. भाजप नेते गिरीश नेते यांनी टीका केल्यानंतर त्याला खडसे यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. खडसे यांनी महाजन आणि फडणवीसांवर टीका केली. खडसे म्हणाले, की मला विनाकारण टार्गेट करण्यात आले. माझ्या मागे कधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कधी प्राप्तीकर विभाग तर कधी अंमलबजावणी संचालनालयाचा ससेमिरा लावला. त्यांनी कुठराली गैरव्यवहार झाला नाही, असे सांगितले.
नाथाभाऊंच्या जीवावर जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि दूध संघ ताब्यात आले. विकासकामे मार्गी लागली, त्यांनाच तिकीट नाकारले. मला वाटले नव्हते की भाजप नेते इतके कृतघ्न असतील, अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली. नाथाभाऊंचे शंभर उतारे असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केला. त्यांना मी आव्हान देतो की, मी जे कमविले ते प्राप्तीकर विभागाला दाखविले. त्याच्यापेक्षा एक रुपयापेक्षा जास्त संपत्ती असेल तर मी ती तुम्हाला दान करेन, असे प्रत्युत्तर खडसे यांनी दिले.