इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः निवडणुकीनंतर शरद पवार व अजित पवार एकत्र येणार अशी चर्चा चालु असतांना अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले की सात तारखेला बारामतीचे मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरू आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे, की मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरून राहणार असल्याचे सांगत एकत्र येण्याच्या शक्यतेच्या वृत्ताचे खंडण केले.
बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, या प्रश्नावर पवार म्हणाले, की निवडणुकीत भावनिक नाते चालत नाही. सात मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचे नाही असे मी ठरवले आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीने करता येईल. बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे.