नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. डॅा. तुषार शेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने या ठिकाणी प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी कोतवाल यांच्याकडे दिली आहे.
धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात डॅा. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या डॅा. शेवाळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने त्यांचा राजीनामा स्विकारुन या जागी नवीन नियुक्ती केली आहे.
डॅा. शेवाळे यांची समजूत काढून त्यांचा राजीनामा नामंजूर करेल असे सर्वांना वाटत असतांना काँग्रेसने मात्र राजीनामा स्विकारुन एक प्रकारे डॅा. बच्छाव यांची उमेदवारी बदलणार नसल्याचे संकेत दिले आहे. धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनीही राजीनामा दिला आहे. पण, त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला हे अद्याप समोर आले नाही.