नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्गावर हाणामारीची कारवाई करीत असतांना संतप्त कोयताधारी त्रिकुटाने पोलीसास शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
आवेश इम्रान अन्सारी (२७ रा.परनो अपा.भारत पेट्रोल पंपाजवळ),जाकिर बसीर शहा (२२ रा..म्हाडा बिल्डींग,वडाळागाव) व आरिफ हामीद शहा (२४ रा.गंजमाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अंमलदार राजेंद्र नाकोडे यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (दि.११) रात्री संशयित महामार्गावरील मुंबई नाक्याकडून द्वारकेच्या दिशेने जाणा-या सर्व्हिसरोडवर आरडाओरड करीत हाणामारी करतांना मिळून आले होते.
या घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलीसांनी धाव घेत संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार लोखंडी कोयता मिळून आला होता. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाई करून अटकेपूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात घेऊन जात असतांना ही घटना घडली. पोलीस वाहनात संशयितांना अधिकारी कर्मचा-यांना शिवीगाळ व दमदाटी करीत शासकिय कामात अडथळा आणला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.