– भास्कर कदम, नांदगाव
‘सोप्पंय सगळं’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास हजेरी लावली, तेव्हा बाहेर अवकाळी पाऊस बरसत होता. निसर्गाचं वातावरण व पर्यावरण तर सगळंच बिघडलेलं होतं. अशाही वातावरणात सगळं काही सोपं आणि सहज सुंदर केलं ते कालिदास कला मंदिरातील बहारदार कार्यक्रमाने. शब्दांत किती ताकद असते, याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. हेमंत टकले, विश्वास ठाकूर असे राजकारणी कम साहित्यिक आणि अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, सुनंदा भोसेकर, हेमंत दिवटे, एकनाथ पगार, दा. गो. काळे, सरबाजीत गरचा, स्वतः देविदास चौधरी अशी नामांकित कवी, समीक्षक, साहित्यिक मंडळीने विचार मंच सजलेला होता. सभागृह श्रोत्यांनी बहरलेले होते. यातही नामांकित तशीच जाणकार, दिग्गज मंडळीसह आप्तस्वकीय मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणजेच आतील वातावरण सहज, सुंदर, संवादी होतं.
प्रारंभी प्रकाशक सरबजीत गरचा यांनी ‘सोप्पंय सगळं’ची प्रसवकळा आपल्या प्रास्ताविकात मांडली. मूळ पंजाबी भाषिक असलेला सरबजीत मराठीच्या त्यातही कवितेच्या प्रेमात पडतो, ही बाब खासच होती. ‘कॉपर कॉईन’ ही दिल्लीस्थित त्यांची प्रकाशन संस्था. या संस्थेने मराठी कवितेच्या प्रेमात पडावं, म्हणजे भाषेला प्रांताचं बंधन अडसर ठरु शकत नाही, हे अधोरेखित झाले. यासाठी सरबजीत यांना धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडेच. कवितेच्या दर्जाला साजेशी मांडणी व बांधणी खूपच दर्जेदार. पुस्तक हाती घेताच त्यात डोकावण्याचा मोह होतो. डोकावलं की वाचण्याचा मोह होतो आणि वाचून अंतर्मुख होतो. कमीतकमी शब्दात अवकाश व्यापणारा आशय ही बाब मुळात अवघड. ती किमया साधलीय देविदास चौधरी यांच्या वास्तववादी कवितांनी. जे दिसलं ते मांडलं. शब्द बंबाल काहीही नाही, मोजक्या शब्दात मोठा आशय ही किमया त्यांनी साधली आहे. त्यांच्या कवितांचे अनेक भाषांतर होऊ शकते. अशी बहुभाषिकता त्यातील आशयाला लाभली आहे. याच संग्रहातील एका कवितेत ते म्हणतात,
‘ आयुष्यभर वाचतो
एकच एक पुस्तक
करतो त्यावर
चिंतन, प्रवचन, मनन
मग ढीगभर पुस्तकं कशाला ? ‘
या संग्रहात एकूण 75 कविता आहेत. भवताल, समकाल, कविता बिविता, लिहिता लिहिता, अशुभ वर्तमान, तहहयात या 7 कप्प्यात त्यांचा समावेश आहे. यातील कविता वाचता वाचता वाचक अंतर्मुख होतो. तो त्या वातावरणात कळत न कळत समरस होतो. या कवितांची समीक्षा करण्याची पात्रता माझी नाहीय. पण शब्दांवर प्रेम आहे त्यातील मर्म माझ्या अंतर्मनाला स्पर्श करते. जे पाहिले, वाचले, भावले ते इतरांना सांगितले पाहिजे, ही माझी धारणा आहे, स्वभाव आहे.
उपस्थित जाणकार पाहुण्यांनी देविदास चौधरी यांच्या कवितेचे मर्म आपल्या भाषणातून उलगडवून दाखविले. हा संस्मरणीय समारंभ कायम माझं स्मरणात राहील. कारण त्यातील भव्यता नाही तर भावगर्भतः विशेष भावली. अशोक नायगावकर यांनी आपलं मनमाडचं नातं सांगितलं. मी नांदगावचा म्हणजे आमच्या तालुक्यात त्यांचे वास्तव्य होते याचा अभिमान वाटला. मनमाडचा ऋणानुबंध आजही त्यांच्या मनात कायम आहे हे विशेष भावले. मनमाडी भाषेची लय आपल्या कवितेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. मातीशी नाळ कायम असणे याला म्हणतात. अरुण म्हात्रे यांचीही नाळ मनमाडशी जोडलेली आहे. एकनाथ पगार हेही मनमाडचे हे माझे दृष्टीने अभिमानाचे होय. मनमाड हे फक्त दक्षिणेचे प्रवेशद्वार नसून तेथे कामगार आणि साहित्यिक एकत्र नांदतात, त्यांची भूमिका परस्पर पूरक असते, ही बाब विशेष आहे. येथे प्राचार्य म. सु. पाटलांचा आवर्जून उल्लेख झाला. साहित्य चळवळ बहरली ती त्यांच्यामुळेच असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच मुशीत आणि मातीत देविदास चौधरी यांची जडणघडण झालीय, हे महत्वाचे होय. ते आमचेच नव्हेतर अनेकांचे मित्र आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.
हेमंतजी टकले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खऱ्याअर्थाने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली, असे गौरवोद्गार काढले ही देविदास चौधरी यांच्या कवितेला मिळालेली खरी दाद होती.
देविदास चौधरी हे मैत्रीला जागणारे दिलदार मित्र आहे, त्यांनी त्यांच्या पुस्तकाची भेट आवर्जून दिली. त्यावरील सही मी मनात जपून ठेवली आहे. मी काही पुस्तके विकत घेऊन काही वाचनालयास भेट देणार आहे, आपणही याचे अनुकरण करावे, ही अपेक्षा ! दिलदार देवदास या मित्रास भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!