लासलगाव – जिल्ह्यात बेकायदेशीररित्या खेळल्या जाणाऱ्या रोलेट झुगार चालकांवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर यांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री पिंपळगाव बसवंतसह ओझर शहरात छापमारी करत नाशिक जिल्हातील चार तर मुंबई येथील तीन रोलेट झुगार चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. याबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात सात रोलेट चालकांविरुद्ध गुरुवारी सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे पथक नाशिक परिक्षेत्र हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीतील चिंचखेड चौफुली व निफाड फाटा परिसरात काही इसम अवैधरित्या रोलेट नावाचा ऑनलाइन जुगार खेळत व खेळवीत असल्याच्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे छापमारी करत पिंपळगाव बसवंत येथील संदीप राजेंद्र भोई वय २९, दीपक राजेंद्र भोई वय ३५, कृष्णा नाना महाले वय २४, ओझर येथील कुमार त्रिंबक जाधव वय ५२ आदींकडून ३२हजार पाचशे रुपये रोख तर २५हजाराचा मोबाईल असा ५८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर अन्य मुंबई येथील अचल चौरसिया, रमेश चौरसिया, प्रकाश भाई आदी तिघे फरार झाल्याने नाशिक परिक्षेत्रातील पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात रोलेट चालकांविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहे.