नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ माहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याव यावे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक त्या सर्व दक्षता घेवून पल्स पोलिओ मोहिम यशस्वीपणे पार पडेल यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेच्या लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अजिता सांळुखे, मालेगांव महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, सर्व्हेलन्स मेडीकल ऑफीसर डॉ. प्रकाश नांदापूरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, येत्या २३ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिम राबविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेवून मोहिमेच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा. तसेच तालुका पातळीवर सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एएफपी रुग्णांची नियमित तपासणी करुन टूल सॅम्पल तपासणीसाठी पुढे पाठवावेत, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिल्या आहेत.
मालेगावात पोलिओ व कोरोना लसीकरणासाठी विशेष प्रयत्न
मालेगाव शहरात मुस्लीम बांधवाच्या मनात लसीकरणाविषयी गैरसमज आहेत. पल्स पोलिओ मोहिम राबवितांनाही ही समस्या उद्भवली होती. परंतू जनजागृती व विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण पोलिओ लसीरकरण मोहिम यशस्वी केली. त्याच प्रकारे कोरोना लसीकरणाबाबतही मालेगांव शहरात विशेष प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
भारताला मिळाले 2014 रोजी ‘पोलिओ फ्री’ चे प्रमाणपत्र
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर 1995 पासून नियमितपणे राबविण्यात येत असूनही पोलिओचे आव्हान पूर्णत: संपुष्टात आले असे नाही. महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात चार व बीड जिल्ह्यात एक असे एकुण पाच पोलिओ रुग्ण आढळले होते. संपूर्ण देशात 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही, हे आजवर सातत्यपूर्ण राबविल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे. यामुळेच देशाला 2014 रोजी ‘पोलिओ फ्री’ चे प्रमाणपत्रही देण्यात आले असल्याची माहिती, सर्व्हेलन्स मेडीकल ऑफीसर डॉ. प्रकाश नांदापूरकर यांनी दिली. तसेच पल्स पोलिओ मोहिमेसाठी 2021 वर्षात जगात फक्त दोनच पोलिओचे रुग्ण असून इतिहासातील पहिलेच वर्ष असल्याचेही डॉ. नांदापूरकर यांनी यावेळी सांगितले. 23 जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेत नाशिक जिल्ह्यात एकूण 8 लाख 38 हजार 687 बालकांना डोस देण्यात येणार आहे. यासाठी 8 हजार 387 बुथची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी 16 हजार 774 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. भोये यांनी दिली.