नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय लष्कराचे मोठे केंद्र असलेल्या देवळाली कॅम्प परिसरात तोतया व्यक्तींचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गेल्या ९ दिवसांपूर्वी एका तोतया मेजरला अटक केल्यानंतर आज पुन्हा एका तोतया मेजरला पकडण्यात आले आहे. पुण्यातील लष्करी गुप्तहेर विभागाने ही कारवाई केली आहे. यामुळे लष्कराला आता आणखी सतर्क रहावे लागणार हे स्पष्ट होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तोतया मेजर आणि त्याचा साथीदार तोतया माजी सैनिक यांना देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या पुण्यातील दक्षिण कमांडच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या हद्दीतील गेट नंबर ७ येथे एका अवेंजर गाडीवर आर्मी असे लिहिलेले लष्कराच्या एका वाहनातील अधिकाऱ्यांना आढळले. पथकाने तातडीने या वाहनातील व्यक्तीकडे विचारणा केली. वाहनामध्ये बसलेली व्यक्ती मोहम्मद असद मुजिबुल्लाखान पठाण मौलाना (रा. रेहमान नगर, देवळाली कॅम्प) ही होती. त्याकडे ओळखपत्राची विचारणा करण्यात आली. आपण माजी सैनिक असल्याचे त्याने सांगितले. तसेच, एक्स इंडियन आर्मी सिक्युरिटी सर्विसेस असे नाव लिहिलेले ओळखपत्र त्याने दाखविले. हे ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आर्मी जवानांनी तातडीने लष्करी गुप्तहेर विभागाला माहिती दिली. त्यानंतर आर्मी इंटेलिजन्स आणि सेना पोलिस यांनी कसून चौकशी केली. त्यात हे स्पष्ट झाले की, सदर ओळखपत्र आफताफ मन्नान शेख उर्फ तोतया मेजर खान (रा. आडके नगर, देवळाली कॅम्प) याने बनवून दिले आहे.
तोतया मेजर खान हा लष्करी गुप्तहेर विभागाच्या रडारवर गेल्या एक वर्षापासून होता. तो खूप चलाख असल्यामुळे सापडत नव्हता. अखेर सदर तोतया मेजर खान यास चौकशीसाठी बोलविण्यात आले. कान हा महिंद्रा थार गाडीमधून आला. या वाहनावरही आर्मी असे लिहिलेले होते. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांचेही मोबाईल तपासले असता त्यामध्ये आर्मी युनिफॉर्म घातलेले फोटोज तसेच ओळखपत्र आणि तोतया मेजर खान यांचे संशयास्पद फोटो आढळून आले. दोघांच्या लष्करी विभागातील संशयास्पद हालचाली आणि उद्देश लक्षात घेता दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, गेल्या २८ डिसेंबर रोजी लष्करी गुप्तहेर विभागाने तोतया मेजर गणेश वाळू पवार याला अटक केली होती. म्हणजेच, गेल्या ९ दिवसात दुसरा तोतया मेजरला जेरबंद करण्यात यश आले आहे.