नवी दिल्ली – जागतिक परिपेक्ष्यात सध्या अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांची स्पर्धा सुरू आहे. जागतिक महासत्ता होण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान शीतयुद्ध सुरू आहे. आर्थिक मदतीच्या बहाण्याने चीन विस्तारवादी धोरण राबवत आहे. तर अमेरिका चीनशी वाकडे असणार्या देशांना मदत करून कोंडी करत आहे. दोन्ही देशांदरम्यानची ही स्पर्धा युद्धाला तोंड तर फोडणार नाही ना अशीच सध्या परिस्थिती आहे. आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी चीनने वीस वर्षांपूर्वीच प्रयत्न सुरू केले होते. त्याचे परिणाम आता दिसून येत असून, चीन आता जगातील सर्वात श्रीमंत देश झाला आहे. अमेरिका आता दुसर्या स्थानावर आला आहे.
गेल्या वीस वर्षांदरम्यान जगातील संपत्ती तीनपट वाढली आहे. विशेष म्हणजे जगाच्या एकूण संपत्तीच्या या तीनपट हिश्शात एकट्या चीनची एक तृतीयांश भागीदारी आहे. एवढेच नव्हे, तर गेल्या दोन दशकांदरम्यान संपत्तीच्या बाबतील अमेरिकेला पिछाडीवर टाकून चीन पहिल्या क्रमांकावर आला आहे. जगातील ६० टक्के मिळकतीसाठी जबाबदार दहा देशांच्या ताळेबंदावर नजर ठेवणार्या मॅकिन्से अँड कंपनी या व्यवस्थापन सल्लागार कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
धनाड्य देशांची संपत्ती
जगात सर्वाधिक संपत्ती असणारा चीन आणि दुसर्या क्रमांकारवरील अमेरिकेतही काही मोजक्या धनदांडग्यांच्या हाती संपत्ती आहे. अहवालानुसार, या दोन्ही श्रीमंत देशात दहा टक्के लोकसंख्येकडेच सर्वाधिक संपत्ती आहे. इतकेच नव्हे, तर या दोन्ही देशातील अशा श्रीमंतांची यादी वाढतच चालली आहे. त्यामुळे श्रीमंत आणि गरिबातील दरी आणखी रुंदावत चालली आहे.
जगात ६८ टक्के स्थावर मालमत्ता
सन २००० मधील जगातील एकूण संपत्ती १५६ खरब डॉलर होती. ती पुढील वीस वर्षात म्हणजेच २०२० मध्ये वाढून ५१ ४ खरब डॉलर झाली आहे. मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचे एक सहकारी जान मिशके सांगातत, जगात आता पूर्वीपेक्षा अनेक श्रीमंत व्यक्ती आहेत. मॅकिन्से यांच्या गणनेनुसार, जगातील एकूण संपत्तीच्या ६८ टक्के संपत्ती स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात आहे. तर इतर संपत्तीमध्ये पायाभूत सुविधा, मशिनरी आणि उपकरणांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. त्याशिवाय खूपच कमी भाग बौद्धिक संपदा आणि पेटेंटच्या रूपात उपलब्ध आहे.
चीनने घेतली उंच भरारी
अहवालानुसार, सन २००० या वर्षामध्ये चीनची एकूण संपत्ती फक्त ७ खर्व डॉलर होती. ती २०२० मध्ये खूपच वेगाने वाढून तब्बल १२० खर्व डॉलर झाली आहे. विशेष म्हणजे सन २००० च्या एका वर्षापूर्वी चीनला जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश मिळाला होता. चीनने या काळात किती वेगाने प्रगती केली हे दिसून येते.
अमेरिकेची संपत्ती दुप्पट
अमेरिकेची संपत्ती गेल्या वीस वर्षात वाढून दुप्पट झाली आहे. सन २००० मध्ये अमेरिकेची संपत्ती ९० खरब डॉलर होती. अहवालानुसार या संपत्तीत खूप जास्त वृद्धी न झाल्याने अमेरिकेची संपत्ती चीनच्या तुलनेत कमीच राहिली आहे. अमेरिकेने आपले पहिले स्थान गमावले आहे.
निवारा मिळणे कठीण
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दशकांदरम्यान जगातील एकूण संपत्तीत झालेल्या वेगवान वृद्धीने जागतिक सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) मध्ये झालेल्या वृद्धीला मागे टाकले आहे. व्याजाचे दर घटल्याने स्थावर मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत. मालमत्तांच्या दरांनी घेतलेली उसळी मिळकतीच्या सापेक्ष दीर्घकालीन सरासरी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे जगातील संपत्तीने घेतलेल्या उसळीवर प्रश्नचिन्ह लागत आहेत. जर जगातील स्थावर मालमत्तांच्या किमती अशाच वाढत राहिल्या, तर नागरिकांना घर खरेदी करणे आवाक्याच्या बाहेर जाईल. परिणामी आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जगाने अशाच ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे जागतिक सकल घरेलू उत्पादन म्हणजेच जीडीपी वाढविण्यास मदत मिळेल.