रायपूर, छत्तीसगढ (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – येथील एक महिला शुभ मुहूर्ताच्या नावावर ११ वर्षे आपल्या सासरी जाण्यास नकार देत होती. प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि रजनी दुबे यांच्या खंडपीठाने हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न रद्द करून दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
संतोष सिंह नावाच्या व्यक्तीने कौटुंबिक न्यायालयात त्यागाच्या आधारावर घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या आधारावरून घटस्फोट देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर संतोष यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. संतोष यांनी याचिकेत सांगितले होते की, त्यांची पत्नी फक्त ११ दिवस त्यांच्यासोबत नांदली. त्यानंतर माहेरी निघून गेली. पत्नीला अनेकदा घरी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु शुभ मुहूर्त नसल्याचे सांगत ती प्रत्येक वेळी घरी येण्यास नकार देत होती. पत्नीच्या म्हणण्यानुसार, तिचे पती शुभ मुहूर्तावर तिला घेण्यासाठी आले नाही. त्यामुळे ती सासरी येऊ शकली नाही. मी पतीला सोडले नसून, फक्त रीत पाळत होते, असे पत्नीने सांगितले.
यावर न्यायालय म्हणाले, की शुभ मुहूर्त एखाद्या कुटुंबाच्या सुखासाठी असतो. या प्रकरणात मात्र शुभ मुहूर्त एक बाधा म्हणून वापरण्यात आला आहे. न्यायालयाने या विवाहाला रद्द करत हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम १३ अंतर्गत घटस्फोटाला मंजुरी दिली. सबळ पुराव्यानुसार पत्नीने पतीला पूर्णपणे सोडले होते. त्यामुळे घटस्फोट हा पतीचा अधिकार आहे.