अश्विनी भाटवडेकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनोरंजन विश्वात आपले आवडते अभिनेते – अभिनेत्री यांच्या आयुष्यात काय चालले आहे याविषयी चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. त्यातही जर ते अविवाहित असतील तर अजूनच उत्सुकता असते. छोटा पडदा असो की मोठा त्याने काही विशेष फरक पडत नसतो. मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा जोशी विवाह बंधनात अडकल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. मुळात तिच्या विवाहाविषयी काहीच चर्चा नसताना अचानक तिने सोशल मीडियावर आयुष्यातली नवी भूमिका म्हणून लग्नाचे फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. सर्वांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे कुठलाही गाजावाजा न करता ती विवाह बंधनात अडकली आहे. मनोरंजन विश्वातील बहुतेक सर्व कलाकार हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्याला नेहा जोशी ही अपवाद नाही. नुकतंच नेहाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे. यातील एका फोटोत नेहाने ही मुंडावळ्या बांधल्या आहेत. यात ती नववधूच्या वेशात दिसते आहे. ‘माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. दुसऱ्या फोटोत नेहा तिच्या नवऱ्यासोबत दिसते आहे. यात तिने मुंडावळ्या बांधल्या असून हातात हिरवा चुडाही घातला आहे. दोघेही यात एकमेकांकडे मोठ्या प्रेमाने पाहत आहेत. नेहाच्या पतीचे नाव ओंकार कुलकर्णी असे आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने ‘अखेर लग्नबंधनात अडकले’ असे म्हटले आहे. नेहाच्या लग्नाचे सुदंर फोटोही आता समोर आले आहे. या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या नवऱ्याविषयी…
नेहाने ओंकार कुलकर्णी याच्याशी लग्न केले आहे. ओंकार हा लेखक आणि दिग्दर्शक आहे. नाटक आणि शॉर्टफिल्मचे देखील त्याने लेखन केले आहे. ‘नॉक-नॉक’ या नाटकातून नेहा आणि ओंकार यांची एकमेकांशी ओळख झाली. नाटकाचे लेखन ओंकारने केले असून त्यात नेहाने मुख्य भूमिका साकारली आहे. नेहा जोशी आणि ओंकार कुलकर्णी गेली अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक प्रोजेक्ट्समध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे.
नेहाची कारकीर्द
नेहाने आतापर्यंत अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात भूमिका साकारली आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा चित्रपटातही ती झळकली होती. तिच्या या नवीन इनिंगला आमच्याही शुभेच्छा.
Actress Neha Joshi Wedding Social Media Post
Entertainment Omkar Kulkarni