मुंबई – केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध झाले आहे. तशी माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.
एका शिधापत्रिकेवर देशात कोठेही धान्य उपलब्ध करुन देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोराम, ओरिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, दादरा-नगर हवेली व दीव-दमण, जम्मू काश्मीर, मणिपूर, नागालॅन्ड, उत्तराखंड येथील शिधापत्रिका धारकांना धान्य उपलब्ध असल्याचे श्री.पगारे यांनी सांगितले. मुंबई / ठाणे शिधावाटप यंत्रणेसह राज्यातील व उपरोक्त नमूद परराज्यातील पात्र शिधापत्रिकाधारक त्यांना देय असलेले अन्नधान्य अधिकृत शिधावाटप दुकानातून त्यांच्या शिधापत्रिकेवर पोर्टबिलिटीद्वारे प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी २ रुपये प्रति किलो दराने गहू, ३ रुपये प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रतिशिधापत्रिका २ रुपये प्रति किलो दराने गहू व ३ रुपये प्रति किलो दराने तांदूळ वितरित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण 5 किलो मोफत अन्नधान्य तसेच सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) मोफत डाळ वितरित करण्यात येत आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य शारीरिक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन पगारे यांनी केले आहे.