जयपूर (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा गेल्या दोन वर्षांपासून कधी सुरु तर कधी बंद आहेत. सहाजिकच शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु यावर उपाययोजना म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र यातही अनेक त्रुटी आहे.
सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागते, इतकेच नव्हे तर टॅब, संगणक किंवा मोबाईल उपलब्ध असला तरी कधी सर्वर डाऊन असते तर कधी सॅटॅलाइट किंवा टॉवर यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे रेंज मिळत नाही. तरीही इतक्या सर्व अडचणी येऊनही अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र अशा प्रकारे ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत असताना राजस्थान मध्ये मात्र एक वेगळाच प्रकार घडला.
राजस्थानमधील उदयपूर येथील सेंट पॉल शाळेच्या शिक्षकाने केलेली एक चूक आता एवढी भयानक चर्चेत आली आहे की, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली आहे. खरेतर या शिक्षकाला इयत्ता दहावीचा ऑनलाइन क्लास घ्यायचा होता, यामध्ये वर्गाच्या लिंकऐवजी शिक्षकाने पॉर्न फिल्मची लिंक शेअर करून ग्रुपमध्ये टाकली. ही लिंक लगेचच शाळेच्या सर्व्हरवर गेली, त्यामुळे ते शिक्षक ही अश्लील लिंक हटवूही शकले नाहीत. सर्व्हर डाऊन असल्याने जवळपास तासभर लिंक तिथेच अडकून राहिली आणि यादरम्यान अनेक मुलांनी तिथली लिंक उघडल्याने हे प्रकरण हळूहळू शाळा प्रशासनापर्यंत पोहोचले.
हा प्रकार विद्यार्थ्यांनी उघडून पाहिल्यावर त्यांनी पालकांना हा गैरप्रकार सांगितला, काही पालकांनी लगेच शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने चूक मान्य करत संबंधित शिक्षक ध्रुव कुमावत यांना नोटीस देऊन उत्तर मागितले आहे. त्याचवेळी शिक्षकाने आपली चूक मान्य करत सांगितले आहे की, ऑनलाईन वर्गाची वेळ झाली होती, त्यामुळे मुलांना तातडीने लिंक पाठवायची होती, त्यावेळी त्याने आपल्या व्हॉट्सअॅपवरील इतर अनावश्यक मेसेज डिलीट करण्यास सुरुवात केली. हा अश्लील मेसेज डिलीट होण्याऐवजी कॉपी झाला आणि चुकून शाळेच्या सर्व्हरवर गेला.
या प्रकरणाचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या व्यवस्थापनाने एक समिती स्थापन केली आहे, त्या शिक्षकाने हे जाणूनबुजून केले की चुकून? ही लिंक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली कशी? याचा तपास करणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सेंट पॉल शाळेबाहेर जोरदार घोषणाबाजी करत सदर शिक्षकावर कारवाईची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने कारवाईचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अशा चुका टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.