इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरामध्ये श्रद्धा वालकर प्रकरण चर्चेत आहे. क्रूरकर्मा आफताब पूनावाला याने तिची क्रूरपणे केलेली हत्या अंगाचा थरकाप उडवणारी आहे. आता या प्रकरणावर लवकरच चित्रपट तयार करण्यात येणार आहे. मनिष सिंह या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते तुकडे त्याने तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिल्याची घटना आठवडाभरापूर्वी समोर आली. ते एका बॅगेत भरुन घेऊन जातानाचे सीसीटिव्ही फुटेज आता समोर आले आहेत. श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित तरुणीच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असतानाच आता दिग्दर्शक आणि निर्माते मनिष सिंह यांनी एक पत्रक जारी करत या कथानकावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर आणि आफताबच्या प्रेमप्रकरणावरील या चित्रपटाच्या पटकथेचं काम सुरू झालं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे वैवाहिक जीवनावर आधारित पण पत्नी-पत्नीमधील बिघडलेल्या संबंधांशी संबंधित कथानक असणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या अगोदर मराठी चित्रपट ‘माझं घर माझं संसार’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अजिंक्य देव, मुग्धा चिटणीस यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. सुखी संसाराचे एक सुंदर चित्र रंगवणाऱ्या जोडप्याचे स्वप्न घरातील कलहामुळे भंग पावते. त्यामुळे नवरा बायको सोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.
डोंबिवलीतील सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट होता. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘डार्लिंग्स’ चित्रपट चांगलाच चर्चेत होता. बदरु ही भूमिका आलियाने साकारली होती. तर विजय वर्माने हमजा ही भूमिका साकारलेली. घरात पत्नीविरोधात होणारी हिंसा हा या चित्रपटाचा गाभा होता. या चित्रपटामध्ये शेफाली शाह यांनी आलियाची आई ‘शामसू’ची भूमिका साकारली होती. पत्नीबरोबरच्या या त्रासदायक नात्यातून बदरु आणि तिची आई कसे बाहेर पडतात याबद्दलची ही रंजक गोष्ट होती.
वृंदावन फिल्मसच्या बॅनरखाली सिंह या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. श्रद्धा आणि आफताबच्या प्रेमप्रकरणावर आधारित चित्रपटाचं प्राथमिक नावही निश्चित झालं आहे. ‘हू किल्ड श्रद्धा वालकर’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटाच्या कथेसंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. सिंह यांच्या टीमकडून दिल्लीच्या आजूबाजूच्या जंगलांमधून व्हिडीओ क्लिप शूट केल्या जात आहे. या चित्रपटाचं शुटींग कुठे कारायचं यासंदर्भातील लोकेशन शोधण्याचं कामही सुरू आहे. या प्रकरणामध्ये दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करत नाही तोपर्यंत चित्रपटाची पटकथा निश्चित केली जाणार नाही असंही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे.