मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी मध्यरात्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत चौधरींनी नवी सुरूवात केली आहे. चौधरी हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते. चौधरींपूर्वी नाशकातील ११ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. चौधरी शिंदे गटात का गेले, त्यांच्या जाण्याचे काय परिणाम होतील, यासंदर्भात खासदार राऊत यांना विचारले असता त्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.
चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे ट्वीट खासदार राऊत यांनी काल रात्री केले होते. आता खासदार संजय राऊत यांनी चौधरी यांचे नाव घेण्याचे टाळले. पुढे ते म्हणाले की, हकालपट्टी होईपर्यंत ते कुणाला माहित तरी होते का? जेव्हा पक्षातून हकालपट्टी झाली तेव्हा लोकांना ती व्यक्ती कळली. पक्षाने पदे दिली, त्यामुळे ते मोठे झाले. आम्हीच त्यांना पदं दिली. तेच काय सर्वच जणं पक्षात असले की जवळचे असतात. शिंदेही माझ्याजवळचे होते, दादा भुसे, उदय सामंत हेही माझ्याजवळचे होते, असेही राऊतांनी स्पष्ट केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे #नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mgDkyuSIc3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2022
पुढे राऊत म्हणाले की, मी पक्षाचा नेता आहे, त्यामुळे पक्षात असलेला प्रत्येक व्यक्ती माझ्याजवळचा असतो. असे लोक पक्षात येतात आणि जातात. पळपुटे लोक आहेत हे. त्यांचे काही व्यक्तिगत कारणं होती, काहींची मजबूरी असते. ते काही लोकनेते नव्हते. पक्षाने पदे दिली म्हणून मोठे होते. हकालपट्टी करेपर्यंत कुणाला नावही माहिती नव्हते. मंत्री निघून गेले, संपर्कप्रमुख निघून गेलेत हे काय घेऊन बसलात, असा उलट प्रश्नच राऊतांनी पत्रकारांना विचारला.
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
Shivsena MP Sanjay Raut on Bhau Chaudhari Exit