नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाषा ही प्रक्रिया असून तिच्या काळानुरुप बदल होत असतात. मराठी भाषा बदलतेयं पण बिघडतेय की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. जर मराठी भाषेतील प्रदूषण टाळायचे असेल तर भाषेवर होणारे अतिक्रमणे थोपविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नाशिक पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी केले.
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या औचित्याने महाकवी कालिदास कला मंदिरात ‘भाषा बदलतेयं की बिघडतेय’ या विषयावर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील बोलत होते. यावेळी वक्ते-डॉ. राम कुलकर्णी, डॉ.अरुण ठोके, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे व किरण सोनार, करुणासागर पगारे, शैलेश माळोदे व सुरेश गायधनी उपस्थिती होते.
शेखर पाटील पुढे म्हणाले की, भाषा काळानुरुप बदलत असून बदल स्वीकारतांना भाषेचे स्वरुप बदलणार नाही याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. भाषा व समाज या दोन्हीमध्ये होणारे परिवर्तन एकमेकांशी निगडीत असल्याने आपल्या माय भाषेला समृद्ध करण्याचा व विकास करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
मराठी भाषेचे प्रदूषण दूरु करण्याची सगळ्यांची जबाबदारी मान्यवरांचा सूर
आपली मातृभाषा, आपण सध्या बोलत असलेली भाषा, आपल्याला मान्य असलेली प्रमाण भाषा हे सारे आपल्या भाषिक चक्राचे महत्त्वाचे घटक आहेत. फक्त भाषिकच नव्हे, भाषेच्या अनुषंगाने येणारी संस्कृती, इतिहास, मान्यता हे सारे या चक्रात येते. त्यामुळे काळानुरूप जरी भाषा बदलत असली तरी हा बदल होत असतांना भाषेचे प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत परिसंवाद उपस्थित सर्व मान्यरांनी व्यक्त केले.
डॉ.अरुण ठोके म्हणाले की, भाषा ही प्रक्रिया असून ती सतत घडत असते. त्यामुळे भाषेकडे सूक्ष्म व संवेदनशीलणे पाहणे गरजेचे आहे. तसेच श्री. माळोदे म्हणाले की, संस्कृतीप्रमाणे भाषा ही प्रवाही असून भाषेतील भाव महत्वाचे आहे. भाषा बदलायला राजकीय सत्तेचाही प्रवाह पडत असल्याचे मत श्री.सोनार यांनी व्यक्त केले.
डॉ.कुलकर्णी म्हणाले की, काळानुसार भाषा बदलणे स्वाभाविक आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा समाजाचा विकास होतो तेव्हा भाषेचाही विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपली भाषा, आपली बोली भाषा या मातृभाषाच असतात. बदलत्या काळात आपल्या भाषेचे संवर्धन करणे खूप गरजेचे असल्याचे श्री.पगारे यांनी सांगितले. काळाप्रमाणे मराठी भाषा बदलत असून नैसर्गिक संवादातून येणारी भाषा कधी बिघडत नसल्याचे मत श्री.बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.