माणिकराव खुळे,हवामानतज्ञ
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुधवार १ मार्च पर्यंत सध्या अनुभवत असलेले पहाटेचे सरासरी इतके किमान तर सरासरी पेक्षा काहीसे कमी दुपारचे कमाल तापमान अशी दोन्ही तापमाने आहे तशीच राहण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात रात्रीचा हलकासा गारवा व दिवसाचा काहीसा कमी ऊबदारपणाही तसाच राहून दुपारचे वातावरणही बुधवार १ मार्च पर्यंत सुसह्य भासेल अशी माहिती हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
पहिल्या पश्चिमी झंजावाताचा आज पर्यंत परिणाम जाणवत असतांनाच लगेचच उद्या मंगळवार २८ फेब्रुवारीपासुन नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तर भारतात जम्मु काश्मिर, हिमालचल प्रदेश, उत्तराखण्ड अशा ३ राज्यात २७ व २८ फेब्रुवारी व १ मार्च ला गडगडाटीसह पाऊस व बर्फीबारीची शक्यता कायम आहे. गुरुवार २ मार्च पासून पहाटेचे किमान सरासरीइतके तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने अधिक राहण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्रात सध्या तरी अजुन पाऊस अथवा गारपिटीची शक्यता जाणवत नाही.