नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणूने गेल्या दोन वर्षात जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉनने सध्या चिंता वाढवली आहे. आणि आता या अवताराचे नवे लक्षण समोर आले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या गटाने ओमिक्रॉनच्या संसर्गाचे नवीन लक्षण शोधून काढण्यात यश मिळविले आहे. ओमिक्रॉन हा डोळ्यांपासून हृदय आणि मेंदूपर्यंत शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करण्यासाठी ओळखला जातो. तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनची काही लक्षणे ही कानात देखील दिसतात.
कोरोना माहामारीच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेतून जगभर पसरलेल्या ओमिक्रॉनने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसत आहेत. मात्र, त्यातून बरे झालेल्या रुग्णांना कायमस्वरूपी काही शारीरिक त्रास जाणवू शकतो, असे वैद्यकीय व आरोग्य शास्त्रज्ञांचे मत आहे. ओमिक्रॉनमुळे संसर्ग झपाट्याने होतो. तसेच हा प्रकार नागरिकांना असुरक्षित बनवत आहे. सर्वात वाईट म्हणजे ओमिक्रॉन संसर्गाची लक्षणे कोवोड-19 साठी नोंदवलेल्या लक्षणांपेक्षा वेगळी आहेत. आतापर्यंत चव आणि वास कमी होणे, ताप आणि फ्लू यांचा समावेश होता. पण अॅमिक्रॉनला आणखी एक लक्षण जोडलेले आहे.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांच्या अंतर्गत कानाच्या मॉडेल्सची चाचणी केली. विषाणूचा श्रवण संस्थेवर कसा परिणाम होतो हे समजून घेतले. रुग्णांना कानात दुखणे आणि आतून मुंग्या किंवा झिणझिण्या अशी लक्षणे जाणवतात. कानात दुखणे, कानात वाजणे, शिट्टी वाजणे, कानात मुंग्या येणे असे वाटत असेल तर हे ओमिक्रॉनचे लक्षण असू शकते. तसेच पूर्णपणे लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये हे प्रकार सर्वात जास्त दिसत असल्याचेही तज्ज्ञांना आढळून आले.
ओमिक्रॉनच्या इतर लक्षणांमध्ये थंडी वाजून येणे, नाक बंद, घसा खवखवणे, अंगदुखी, अशक्तपणा, उलट्या, रात्री घाम येणे, सौम्य ते उच्च ताप, खोकला, सर्दी, थकवा, डोकेदुखी यांचा समावेश आहे. आता नव्या लक्षणामुळे रुग्ण कायमचा बहिरा होऊ शकतो, असे डॉ. कॉन्स्टेंटिना स्टॅनकोविक यांनी म्हटले आहे. रुग्णांना आवाज आणि श्रवणविषयक समस्या येत असल्यास त्यांनी लवकरात लवकर तपासणी केली पाहिजे. दीर्घकाळ उपचार न केल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास, संसर्गामुळे श्रवणा शक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.