मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी अक्षय कुमारच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होतात तर कधी त्याच्या चित्रपटांच्या रिलीज – टीझर – गाण्यामुळे तो प्रसिद्धिच्या झोतात येतो. तसेच अक्षय कुमार त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी कारण आहे त्याचा नवीन फ्लॅट. असे सांगण्यात येत आहे की, अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे, ज्याची किंमत करोडो आहे आणि हा फ्लॅट खूपच आलिशान आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
कोईमोईच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. रिपोर्टमध्ये या नवीन आलिशान फ्लॅटची किंमत ७.८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. खार पश्चिम येथील जॉय लिजेंड बिल्डिंगच्या एकोणिसाव्या मजल्यावर हा फ्लॅट असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही, तर अक्षयला फ्लॅटसह चार वाहनांसाठी पार्किंगची जागाही मिळाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारने डिसेंबर २०२१मध्ये अंधेरी पश्चिम येथे असलेले त्याचे कार्यालय ९ कोटी रुपयांना विकले आहे. त्यानंतर त्याने खार पश्चिम येथे एक नवीन अपार्टमेंट घेतला आहे. सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये या नवीन फ्लॅटचे फोटो बघण्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. मात्र, अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. बॉलिवूडचा खिलाडी कुमार एका वर्षात चाहत्यांना एकापेक्षा जास्त चित्रपटांची भेट देतो. एकीकडे अक्षयचे सिनेमे रिलीज होत असतात, तर दुसरीकडे तो बॅक टू बॅक शूटींगही करत असतो. अक्षयच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, गोरखा, OMG 2, सेल्फी, रक्षाबंधन, मिशन सिंड्रेला, बच्चन पांडे, पृथ्वीराज आणि राम सेतू यांचा या यादीत समावेश आहे.