नितीन नायगावकर इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुलं मोठी झाली की सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकून वडिलांनी निवृत्ती घेतल्याची अनेक उदाहरणं आपण बघत असतो. पण मुलांना मुख्य व्यवसाय सोपवून आपण नवा उद्योग सुरू करण्याचं उदाहरण फारच दुर्मिळ आहे. या दुर्मिळ उद्योजकांमध्ये आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचं नाव जोडलं गेलं आहे.
मुळात मुकेश अंबानी यांचे एवढे उद्योग आहेत की, आता ते एक नवा उद्योग सुरू करणार म्हटल्यार त्याची चर्चा जास्त होणं स्वाभाविक आहे. कारण एकाचवेळी अनेक उद्योग सांभाळण्यात तसाही मुकेश अंबानी यांचा हातखंडा आहे. टेलिकॉम, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स, रिटेल अशी भली मोठी यादी देता येईल. यापैकी थोरला मुलगा आकाश अंबानी याच्याकडे टेलिकॉम व्यवसाय सोपविण्याचा निर्णय अंबानी यांनी घेतला आहे. तर रिटेल व्यवसायाची जबाबदारी मुलगी ईशा अंबानी हिच्याकडे असणार आहे. याशिवाय धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याकडे रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुकेश अंबानी आता पूर्णपणे जुन्या उद्योगांतून लक्ष काढून नव्या कामाला लागणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आणि याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिलेले होते.
मुकेश अंबानी काय करणार?
मुकेश अंबानी आता हरित ऊर्जेच्या क्षेत्रात काम करणार आहेत. 2035 पर्यंत कार्बन नेट-झिरो कंपनी तयार करण्याचे लक्ष्य अंबानी यांनी अर्थात रिलायन्सने ठेवले आहे. यासंदर्भात त्यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यात हरित उर्जेशी संबंधित कंपनी उभी करण्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
काय आहे अहवालात?
मुकेश अंबानी सादर केलेल्या अहवालात गिगा कारखाने आणि ब्ल्यू हायड्रोजन सुविधांचे बांधकाम करणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीसाठी त्यांनी संभाव्य लोकांशी चर्चा देखील केली आहे. विशेष म्हणजे या अहवालात त्यांनी जे उद्देश्य व्यक्त केले आहेत, त्यानुसार ते अदानी ग्रृपला थेट टक्कर देणार आहेत, असे स्पष्ट होते.
Reliance Industries Mukesh Ambani Role Ahead