नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातून तब्बल ४० रांगोळी कलाकार गेले दोन दिवस नाशिकमध्ये वास्तव्याला आहेत. महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हैद्राबाद अश्या सगळ्या ठिकाणाहून हे कलाकार, कलेच्या आणि भारतमातेच्या प्रेमापोटी इथे दोन दिवस राहताहेत, दिवस रात्र रांगोळ्या काढताहेत. अतिशय उत्साहपूर्ण आणि खेळी-मेळीच्या वातावरणात ह्या सर्व कलाकारांनी रांगोळ्या पूर्ण केल्या. आणि त्यांनी साकारलेल्या या अनोख्या रांगोळीचे प्रदर्शन सध्या नाशकात सुरू आहे.
शंकराचार्य न्यासाने संस्कार भारतीच्या सहकार्याने आगळे वेगळे रांगोळी प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा प्रारंभ शास्त्रीय संगीत गायिका मंजिरी असनारे-केळकर ह्यांच्या सुमधूर वंदे मातरम् गायनाने झाली. येत्या १८ ऑगस्ट पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले राहणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीत आणि प्रगतीत योगदान दिलेल्या महात्म्यांच्या प्रतिमांचे हे अप्रतिम रांगोळी प्रदर्शन आहे. दररोज मोठ्या संख्येने नाशिककर या प्रदर्शनाला भेट देत आहेत. गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलामध्ये हे प्रदर्शन सध्या सुरू आहे.
Rangoli Exhibition 40 Artist of Participation
Nashik Shankaracharya Nyas Sanskar Bharti