इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -१८)
चिंतामणी गुफा , किष्किंधा
|| श्रीरामाने केला वाली वध ||
वाल्मिकी रामायणात ‘वाली’ आणि ‘सुग्रीव’ ही महत्वाची पात्र आहेत. वाली हा सुग्रीवचा मोठा भाऊ होता. तो किष्किंधा नगरीचा राजा होता. वाली हा इंद्राचा पुत्र होता असे म्हणतात पण तो वानर रूपात होता. राम रूपी विष्णूने त्याचा वध केला. रामायणातील किष्किंधाकांड मधील 67अध्यायांत 5 ते 26 अध्यायात वालीचे वर्णन आलेले आहे. रामायणातील हा प्रसंग जेथे घडला त्या किष्किंधा नगरीतील ऋष्यमूख पर्वत आणि तेथील वाली आणि सुग्रीव यांच्या गुहेचा परिचय आपण या भागात करून घेणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
श्रीराम वन गमन मार्ग किष्किंधा पासुन २ किमी अंतरावर चिंतामणी गुफा नावाचे ठिकाण आहे या ठिकाणी श्रीरामाने वालीचा वध करून त्याने बळकावलेले राज्य सुग्रीवाला परत मिळवून दिले तुंगभद्रा नदी काठी एक शिवमंदिर आणि प्राचीन मठ आहे. हे शिवमंदिर आणि मठाची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली होती असे सांगितले जाते. या मंदिरात अन्नपूर्णा देवी सोबतच भगवान शंकराच्या शिवलिंगाचे ही दर्शन होते. हे मंदिर फक्त सकाळीच उघडे असते चौदा ते सतराव्या शतकापर्यंत या मठात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते.
या मंदिरापासून थोड्या अंतरावर मुक्ती नरसिंहाचे दगडी मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात नृसिंहाच्या मूर्ती सोबतच श्रीगणेशाची आणि आदिशंकराचार्याची मूर्ती स्थापना केलेली आहे. येथून नदीच्या काठा काठाने चिंतामणी गुफे पर्यंत जाता येते मोठ मोठ्या दगडांच्या गुफेत चिंतामणी मंदिर आहे. या मंदिराची स्थापना आदिशंकराचार्य यांनी केली आहे. येथे सुरुवातीला एक गुफा आहे. वाली वधा पूर्वी श्रीराम आणि सुग्रीव येथे राहिले होते. गुहेच्या सुरुवातीला एका दगडी शिळेवर राम-सीता यांची मूर्ती कोरलेली आहे. गुफेत जाण्यासाठी मोठमोठया अजस्त्र शिळांमधून जाणार्या पाऊल वाटेने जावे लागते 20-25 पावलांवरच एक विशाल गुफा नजरेस पड़ते. येथे शेकडो टन वजनाचे मोठमोठे दगड एकमेकांवर पडून नैसर्गिक गुफा तयार झाली आहे.
या नैसर्गिक गुफेत बसूनच श्रीराम, लक्ष्मण यांनी सुग्रीव, हनुमान व जाम्बुवंत यांच्याशी सल्ला मसलत करून बलाढ्य वाली चा वध करण्याचे नियोजन केले होते. वालीला मिळालेल्या एका वरामुळे त्याला समोरून देव, मानव, दानव व गंधर्व यांपैकी कुणीही ठार करू शकत नव्हता. त्यामुळेच या गुफेत बसून सुग्रीव व अन्य मंत्र्याच्या सल्याने श्रीरामांनी वाली वधाची रणनिती तयार केली. यामुळेच या गुफेला चिंतामणी गुफा म्हणतात. ही गुफा आतून भरपूर मोठी आहे. या गुफेत एका चबूत-यावर वीरभद्राची मूर्ती आहे. या गुफेचे वैशिष्ट्ये म्हणजे बाहेर कितीही उष्णता असली तरी गुहेत सदैव गारवा असतो. राम लक्ष्मण वालीना वध होईपर्यंत याच गुफेत राहिले होते.
या पहाडा मागे एक मोठा डोंगर आहे. तारा पर्वत म्हणतात या तारा पर्वता जवळच वालीचा महाल होता. तारा पर्वता जवळ वाली आणि सुग्रीव यांचे गदा युद्ध सुरू झाले ते एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या चिंतामणी गुफे पर्यंत आले. हे युध्द तुंगभद्रा नदीच्या पात्रातच झाले. येथे तुंगभद्रा सुमारे एक ते दीड किमी विशाल आहे. पावसाळ्यात तर ती जणू समुद्रा सारखी विशाल होते. वाली आणि सुग्रीव यांच्यात दोन वेळा गदायुध्द्ध झाले. पहिल्या वेळी श्रीरामाला वाली आणि सुग्रीव यांच्यातला फरक न कळाल्यामुळे सुग्रीवाला हार मानून या गुफेचा आश्रय घ्यावा लागला होता. जखमी सुग्रीवावर या गुफेतच उपचार केले होते. या गुफे बाहेर दोन दगडांवर श्रीरामांच्या चरण पादुका कोरलेल्या आहेत. नदीपात्रात दुसऱ्यांदा ज्यावेळी वाली आणि सुग्रीव यांच्यात युध्द सुरू झाले. त्यावेळी रामाला लांबून ओळखू यावे म्हणून सुग्रीवाने गळ्यात पुष्पहार घातला होता.
चिंतामणी गुहे बाहेर पावलं असलेल्या या जागेवर उभ राहूनच श्रीरामाने वालीला बाण मारला आणि वालीचा वध केला. याच तुंगभद्रा तीरावर वालीचा अंत्यसंस्कार करण्यात आला. वालीची भव्य समाधी आजही तुंगभद्रा तीरावर पहायला मिळते. येथील नदी पात्रात एका अति विशाल खडकावर एक भव्य वास्तू ‘दिसते 64 खांबांची ही वास्तू म्हणजे विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांचे स्मृतीस्थळ आहे कृष्णदेवराय यांनीच रामायण कालीन अनेक ठिकाणे आणि स्मृतिस्थळं यांची निर्मिती केली होती.
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Chintamani Gufa Kishkindha by Vijay Golesar