नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक नवनव्या संकल्पना आपल्या आयुष्यात प्रवेश करू पाहात आहेत. पूर्वी जगण्यासाठी स्पर्धा नव्हती. आता स्पर्धा आहे आणि धावपळही आहे. बायको-मुलांसह सुखी असलेला पुरुष असो की आनंदानं कुटुंबाचा भार उचलणारी स्त्री असो, प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे, असं हल्ली डॉक्टर सांगत असतात. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे आपला एक ‘मी टाईम’ निश्चित करणं. प्रत्येकाला या मी टाईमची गरज आहे. अगदी देशाचे सरन्यायाधीश सुद्धा हा ‘मी टाईम’ आवर्जून राखून ठेवतात.
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सगळ्या तणावातून, कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढतात आणि त्या वेळात ते वाचन करणं पसंत करतात. सरन्यायाधीश चंद्रचूड यांची दिनचर्याच वेगळी आहे. म्हणजे तशी दिनचर्या अनेकांची असते. पण सर्वसाधारणपणे पहाटे साडेतीनला उठणे कुणालाच आवडणार नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड पहाटे साडेतीनला दिवस सुरू करतात आणि सकाळी ९.३० पर्यंत त्यांची सगळी सकाळची कामं आटोपलेली असतात.
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सांभाळताना एका आठवड्यात जवळपास अडिचशे खटल्यांवर सुनावणी घ्यावी लागते. हे खटले पूर्णपणे वाचून काढावे लागतात. यात मालमत्तेची प्रकरणं, व्यावसायिक प्रकरणं आणि खुनांचीही प्रकरणं असतात. या सगळ्या खटल्यांचं आणि न्यायालयीन कामकाजांचं मॅनेजमेंट त्यांना करावं लागतं. हे वाटतं तेवढं सोपं नाही. एकतर सरन्यायाधीश म्हणून त्यांच्यावर संपूर्ण देशाची नजर असते. शिवाय प्रत्येक खटल्याची सुनावणी घेताना त्याच्या सामाजिक परिणामांची आणि दुष्परिणांचीही चिंता करावी लागते. पण हे सारं व्यवस्थित पार पाडण्यासाठी ते पहाटे साडेतीन वाजता उठतात आणि १० पर्यंत दिवसभराच्या कामकाजासाठी सज्ज असतात.
‘मी टाईम’मध्ये काय करतात?
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना स्वतःला वेळ द्यायला आवडतं. त्यांनी त्यासाठी रात्री आठनंतरचा वेळ ठेवला आहे. रात्री आठनंतर पुढचे एक-दोन तास ते वाचन करतात. त्यांच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करतात. त्यांना कोल्डप्ले बँड आणि ख्रिस मार्टिन या गायकाची गाणी ऐकायला आवडतं.
नोव्हेंबर २०२४ पर्यंत सरन्यायाधीश
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये कार्यभार स्वीकारला. त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांची एकूण दोन वर्षांची कारकीर्द राहणार आहे. त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे भारताचे १६वे सरन्यायाधीश होते. त्यांच्या पत्नी कल्पना या सुद्धा वकील आहेत.
Chief Justice of India CJI Daily Routine Lifestyle