नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपवर सातत्याने राज्य सरकारांना आणि प्रादेशिक नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो. पण त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत कधीच बोलले नाहीत. आज मात्र त्यांनी संसदेत भाषण करताना काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसनेच सर्वाधिक राज्य सरकारे पाडली आणि प्रादेशिक नेत्यांना त्रास दिला, असे आरोप पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील चर्चेला उत्तर देत होते. या चर्चेमध्ये भाजपवर घटनेतील कलम ३५६ चा गैरवापर करण्यासंदर्भात विरोधकांनी आरोप केले. त्याला नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. कलम ३५६ चा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसच्या राजवटीत झाल्याचे ते म्हणाले. ईडी आणि सीबीआयसह इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोपही चर्चेदरम्यान विरोधकांनी केला होता.
त्यावर मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने इतिहास तपासून बघण्याची गरज आहे. आमच्यावर राज्य सरकारांना अडचणीत आणत असल्याचा आरोप होत असतो. पण कोणत्या पक्षाने या कलमाचा सर्वाधिक गैरवापर केला आहे, हे एकदा तपासून बघा.’ मी शरद पवारांचा खूप आदर करतो. त्यांचेही सरकार १९८० मध्ये काँग्रेसनेच पाडले. प्रत्येक प्रादेशिक नेत्याला त्रास देण्याची काँग्रेसच्या राजकारणाची पातळी आहे, असेही ते म्हणाले.
पं. नेहरू आणि इंदिरा गांधींनी हे केले…
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा आज मोदींनी पुन्हा एकदा उल्लेख केला. ‘काँग्रेसने एकूण ९० वेळा निवडून आलेली राज्य सरकारे पाडली. त्यात एकट्या इंदिरा गांधींनी ५० वेळा कलम ३५६ चा गैरवापर केला. केरळमध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार निवडून आले. पण ते पं. नेहरूंना आवडले नाही आणि त्यांनीही सरकार पाडले,’ असे मोदी म्हणाले.
वैज्ञानिकांना बदनाम केले
काँग्रेसने भारतीय वैज्ञानिकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना देशाची चिंता नाही, फक्त आपल्या राजकीय भवितव्याची चिंता राहिली आहे, असा आरोप करत काँग्रेस हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विरोध करणारा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/1623602448077328385?s=20&t=XxuNv7880OpV3q9P65JJHQ
PM Narendra Modi Speech in Rajyasabha Congress Allegation