पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगावन शहरातील जुना आग्रा रोडवरील बस स्थानक ते स्टेट बँक कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी रस्त्यालगत लावलेल्या अनाधिकृत वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेकडून कठोर पावले उचलली आहे. निफाड फाटा ते दिवाणी न्यायालयपर्यंत रस्त्यावर अनधिकृत वाहन पार्क करणाऱ्या वाहन धारकांवर गुरुवार सायंकाळपासून वाहन जप्ती करून दंडात्मक कारवाई प्रारंभ करण्यात आल्याने पिंपळगावकरांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले.
पिंपळगाव बसवंत शहरातील जुना आग्रारोडरील बस स्थानक ते स्टेट बँक कॉर्नर पर्यंत रस्त्याचे काम एकेरी बाजूने सुरू आहे.तर वाहतूक देखील समोरील एकेरी बाजूने सुरू आहे.परिणामी परिसरात सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीचा वाहन धारकांसह पिंपळगावकरांना होणारा त्रास लक्षात घेता पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचे सरपंच भास्कर बनकर यांनी कर्मचाऱ्यासमवेत गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी जुना आग्रारोड रस्त्याची पहाणी केली.जुना आग्रा रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा दुकानासमोरील रस्त्यावर अनधिकृत पार्किंगमुळेच वाहतूक कोंडी होत असल्याची बाब सरपंच बनकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने ग्रामपालिका कर्मचाऱ्यांना सदर परिसरात नो पार्किंगचा बोर्ड लावून वाहनधारकांची जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जनजागृती करून देखील नियम मोडणाऱ्या व अनधिकृत रस्त्यावर वाहने पार्क करणाऱ्या वाहन धारकांवर गुरुवारी सायंकाळी वाहन जप्ती करून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले.
आधी जनजागृती मग कारवाई…
जुना आग्रारोडवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याची ग्रामपालिकेकडून गुरुवारी दुपारपर्यंत वाहन धारकांना फिरत्या वाहनांच्या माध्यमातून माईक द्वारे जुना आग्रा रोडवर वाहने पार्क न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन धारकांवर गुरुवार सायंकाळपासून दंडात्मक कारवाईस प्रारंभ करण्यात आल्याने ग्रामपालिकेच्या या कारवाई मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.