नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीलंकेमध्ये अदानी उद्योग समुहाला ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाए राजपक्षे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबाव टाकला होता, असा दावा श्रीलंकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नंतर संबंधित अधिकाऱ्याने घूमजाव केले असून, श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयानेही हे वृत्त फेटाळले आहे.
श्रीलंकेच्या मन्नार जिल्ह्यात ५०० मोगावॉट क्षमतेचा अक्षय्य ऊर्जा प्रकल्प आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या सिलोन वीज मंडळाचे अध्यक्ष एमएमसी फर्डिनांडो शुक्रवारी कोलंबोमध्ये संसदीय पॅनल असलेल्या पब्लिक एंटरप्रायजेस समितीला संबोधित करत होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प अदानी यांना देण्यासाठी राष्ट्रपती राजपक्षे यांच्यावर दबाव टाकला होता अशी माहिती राजपक्षे यांनी दिल्याचा दावा अधिकाऱ्याने केला. मोदी यांचा दबाव असल्याचे राजपक्षे यांनी म्हटले होते. राष्ट्रपतींनी त्यांना अदानी समुहाला प्रकल्प देण्यास सांगितले होते, असे फर्डिनांडो यांनी सांगितले.
राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर फर्डिनांडो आणि अदानी यांच्यादरम्यान यासंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र काही वेळातच फर्डिनांडो यांनी घूमजाव केले. भावनाअतिरेकात ते असे बोलून गेले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. राष्ट्रपती राजपक्षे यांनी यावर त्वरित प्रतिक्रिया दिली. या वृत्ताला त्यांनी ट्विटरवर फेटाळले आहे. राजपक्षे सांगतात, मन्नार येथील पवन ऊर्जा प्रकल्पाबद्दल माझ्यावर असा कुठलाही दबाव नव्हता.त्यानंतर त्यांच्या कार्यालयाने वृत्ताचे खंडन केले. या प्रकल्प देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दबावाचे वृत्त चुकीचे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अदानी समुह श्रीलंकेत वेगाने हात-पाय पसरत आहे. गेल्या वर्षी अदानी समुहाने कोलंबोमधील एका बंदराच्या पश्चिम कंटेनर टर्मिनल विकसित करण्याचा करार ५१ टक्क्यांच्या भागीदारीसह मिळवला होता. या वर्षी मार्चमध्ये समुहाला दोन अक्षय्य ऊर्जा प्रकल्प, एक मन्नार आणि दुसरा पुनेरिन येथील प्रकल्प मिळाला आहे. हे दोन्ही प्रकल्प उत्तर श्रीलंकेमध्ये आहेत. दरम्यान, राजपक्षे सरकार मित्र मोदी यांचे हित साधण्यासाठी आणि त्यांना देशात मागच्या दाराने प्रवेश देण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप श्रीलंकेतील विरोधी पक्ष करत आहेत.