नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यासाठीची अंतिम मुदत संपल्यानंतर या वस्तूंचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. या लिलावात अनेकांनी चांगली बोली लावली. सर्वाधिक १४० बोली सरदार पटेल यांच्या मूर्तीवर लावण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या भाल्याला सर्वाधिक १.५ कोटी रुपयांची बोली लागली आहे.
त्यानंतर सर्वाधिक बोली लावलेल्या वस्तूंमध्ये गणपतीची लाकडी मूर्ती (११७), पुणे मेट्रो लाइनचे स्मृतिचिन्ह (१०४) आणि विजय लॉ स्मृतिचिन्ह (९८) यांचा समावेश आहे. नीरज चोप्राच्या भाल्याशिवाय भवानी देवी यांनी स्वाक्षरी केलेल्या फेंसची १.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. सुमित अंतिलच्या भाल्याला १.२ कोटी रुपये देण्यास ग्राहक तयार झाले. टोकियो २०२० पॅरोलिम्पिकमधील खेळाडूंची स्वाक्षरी असलेल्या कपड्यांची किंमत १ कोटी रुपये लावण्यात आली. लव्हलिना बोरगोहेनच्या बॉक्सिग ग्लव्हजची किंमत ९१ लाख रुपये लावण्यात आली.
१६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या स्वागत समारंभादरम्यान सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राने पंतप्रधान मोदी यांना आपला भाला भेट दिला होता. या भाल्यासह भारतीय अॅथलिटनी वापरलेले ऑलिम्पिकमधील सामान ई लिलावासाठी ठेवण्यात आले होते. नीरजचा भाला नॉर्डिक स्पोर्ट्सने तयार केला आहे. बाजारात या भाल्याची किंमत ८० हजार रुपये आहे.
या लिलावात १३४८ स्मृतिचिन्हे ठेवण्यात आली होती. त्यासाठी ८६०० बोली लावण्यात आल्या. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव सुरू होता. लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे या योजनेच्या माध्यमातून गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. गेल्या वेळी सप्टेंबर २०१९ मध्ये २,७७० वस्तूंचा लिलाव झाला होता. त्यावेळी मिळालेला निधीसुद्धा नमामी गंगे या मोहिमेसाठी वापरण्यात आला होता.