नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुग्णांची उत्कृष्ट सेवा, उच्च दर्जाची काळजी आणि सुरक्षा उपलब्ध करून दिल्याबद्दल येथील श्रीगुरुजी रुग्णालयास नॅशनल अक्रिडीएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर या राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळाकडून सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्राचा प्रदान सोहळा ‘टीडीके इंडिया’चे चेअरमन हरिशंकर बॅनर्जी यांच्या हस्ते बुधवारी झाला. याच प्रसंगी रुग्णालयाच्या ‘रुग्ण सेवा सदना’ साठी श्री. बॅनर्जी यांनी कंपनीतर्फे वीस लाख रुपयांचा धनादेश रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोवीलकर यांना दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अश्विनीकुमार तुपकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर उपचार घेण्यासाठी रुग्णांना नाशिकला येऊन बरेच दिवस राहावे लागते. त्यांची आर्थिक आणि राहण्याची गैरसोय दूर करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात रुग्णसेवा सदनाची उभारणी सुरू आहे. येथे रुग्ण आणि त्याच्या एका नातेवाईकाची निवास आणि भोजनाची व्यवस्था अल्प दरात केली जाणार आहे, अशी माहिती सह कार्यवाह डॉ. गिरीश चाकुरकर यांनी दिली.
हृदयरोगासाठी कॅथलॅब
हृदयरोगावरील उपचारासाठी श्रीगुरुजी रुग्णालयात लवकरच नवीन कॅथलॅब सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मुकुंद खाडिलकर यांनी दिली. रुग्णालयाच्या नवीन विस्तारित ९ मजली इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होत असल्याचे ते म्हणाले.
एनएबीएच मानांकन मिळविण्यासाठी सौ. प्रेरणा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले तसेच क्वालिटी विभागाच्या डॉ. पूनम पगारे यांचे सहकार्य मिळाले. नुकत्याच रुजू झालेल्या नेत्ररोग सर्जन डॉ. सौदामिनी निघूते वांगीकर यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. कोमल लऊळ खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
Nashik Shree Guruji Hospital NABH Certification