विशेष प्रतिनिधी, नाशिक
बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अखेर आज प्रारंभ करण्यात आला. विकासाचा सुर्वण त्रिकोण साधणाऱ्या या मार्गामुळे नाशिकच्या विकासात अधिकाधिक भर पडणार आहे. आज सकाळी नाशिक तालुक्यातील नानेगाव येथून खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. हे सर्वेक्षण करताना कमीत-कमी शेती क्षेत्र कसे बाधित होईल, यासाठी पर्यायी मार्गाचे देखील सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करतांना शेतकरी हितालाच प्राधान्य देवून हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण साधण्यात येईल, असे आश्वासन गोडसे यांनी दिले आहे.
नाशिकसह पुणे, मुंबई येथील औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिक तसेच नागरिकांनी रेल्वेमार्गाचा हा सुवर्ण त्रिकोण साधला जाणार आहे. या रेल्वेमार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. केंद्राने आणि राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच नाशिक–पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. सदर रेल्वे मार्गाला साडे सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राज्य शासन साडेतीन हजार कोटी व केंद्र शासन साडेतीन हजार कोटी रुपये निधी देणार असून सुमारे नऊ हजार कोटी रुपये निधी हा इक्विटीतून देण्यात येणार आहे. (राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी वीस टक्के तर साठ टक्के इक्विटीतून उपलब्ध करण्यात येणार आहे.)









