का सोडत आहेत युवा नेते काँग्रेसची साथ; जितिन प्रसादनंतर आता कोण?

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्री मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या आधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जितिन प्रसाद यांच्या पक्ष सोडण्यामुळे राहुल गांधी यांची युवा नेत्यांच्या फळी विस्कळित झाल्याचे चित्र आहे. आगामी काळात अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
जितिन प्रसाद २०१९ लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्ष सोडण्याची चर्चा होती. परंतु काँग्रेसने ही चर्चा फेटाळून लावली होती. जितिन प्रसाद हे काँग्रेसचे मोठा चेहरा होते. त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनविण्याची चर्चा अनेक वेळा करण्यात आली. परंतु प्रत्येकवेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्येसुद्धा त्यांना प्राधान्य मिळाले नाही. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून असंतुष्ट होते.
काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजपसह समाजवादी पार्टीची नजर आहे. पश्चिम उत्तर प्रदेशचे वरिष्ठ मुस्लिम नेते समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करू शकतात. तसेच दुसर्या नेत्यांसाठी जितिन प्रसाद यांनी भाजपचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी अनेक नेते पक्षांतर करू शकतात. उत्तर प्रदेशच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही पक्षांतर होण्याची चिन्हे आहेत, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
जितिन प्रसाद यांनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसमधील तरुण नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधीच्या टीममधील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांनी पक्षाला रामराम केला. नाराज असलेल्या मिलिंद देवरा यांनी अनेक वेळा पक्षाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन पायलट यांचीही नाराजी उघड आहे.
या नेत्यांसह महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव नाराज आहेत. कधी काळी सोशल मीडियाची जबाबदारी हाताळणार्या दिव्या स्पंदना सध्या शांत आहेत. त्यावरून असे दिसत आहे की पक्षातील युवा नेते जास्त खूश नाहीत. सतत होणार्या पराभवामुळे युवा नेत्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे राजकीय करिअर वाचविण्यासाठी नेते पक्षांतर करत आहेत.
जितिन प्रसाद नाराज का
जितिन प्रसाद अनेक दिवसांपासून पक्षाशी नाराज होते. ते गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा होती. परंतु ती चुकीची ठरली. यूपीमध्ये पराभव झाल्यानंतर राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यानंतर जितिन प्रसाद यांच्या हातात प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अजय कुमार लल्लू यांना सूत्रे सोपविली. शाहजहापूर जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीवर सध्या वाद होता. जितिन प्रसाद यांना त्यांच्या समर्थकाला अध्यक्ष करण्याची इच्छा होती परंतु काँग्रेसने त्याला मान्यता दिली नाही.