अभिमानास्पद! लष्करी हेलिकॉप्टरचे सारथ्य करणार महिला; दोन पायलटसचे प्रशिक्षण सुरू

विशेष प्रतिनिधी, नाशिक
आजच्या काळात बहुतेक सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत. त्यांच्या कामाचा डंका जगभर वाजत असतो. देशाचे रक्षण करणार्या सैनिकांच्या तुकडीत महिला अधिकारी झाल्या आहेत. परंतु दोन महिला जवानांची हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षणासाठी लढाऊ पायलट म्हणून देशात प्रथमच निवड करण्यात आली आहे. नाशिक येथील लढाऊ पायलट प्रशिक्षण केंद्रात (कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल) त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
हवाई दलात महिला अधिकार्यांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी मान्यता दिल्यानंतर ही प्रक्रिया लगेचच लागू करण्यात आली. भारतीय हवाई दल आणि नौदलात आतापर्यंत या अत्यंत खडतर निवड प्रक्रियेत पुरुषांची निवड केली जात होती.

लष्कराच्या हवाई प्रशिक्षणासाठी १५ महिला जवानांनी सहभाग घेतला होता. पायलट बॅटरी अॅप्टिट्यूट टेस्टमध्ये (पीएबीटी) आणि वैद्यकीय चाचणीत दोनच महिलांची निवड करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
नाशिकमधील प्रशिक्षण केंद्रात ४७ महिला जवानांच्या प्रशिक्षणाला सोमवारी (७ जून) सुरुवात झाली. जुलै २०२२ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करून त्या हवाई दलाच्या सेवेत रुजू होऊ शकणार आहेत. आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना जमिनीवरील (ग्राऊंड) ड्यूटीसाठी निवडले जात असे.
सरकारकडील आकडेवारीनुसार, जवळपास ९,११८ महिला जवान लष्कर, हवाई दल आणि नौदलात कार्यरत आहेत. त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना अनेक सेवा प्रदान केल्या जात आहेत, अशी माहिती सरकारकडून फेब्रुवारी २०२१ मध्ये संसदेत देण्यात आली होती.
भारतीय सैन्यदलात महिला जवानांसाठी नवे मार्ग खुले होणे ही आनंददायी गोष्ट आहे. यामुळे जास्तीत जास्त महिलांना सैन्यदलात येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरी सुरक्षा दलाच्या (महाराष्ट्र) उप नियंत्रक राजेश्वरी कोरी यांनी दिली आहे.