नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना वाचविण्यासाठी शिंदे गटाशी दोन हात करीत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे स्थानिक पातळीवर शिलेदार मात्र शिंदे गटाचा उदो-उदो करीत असल्याची बाब समोर आली आहे. माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहरात लावलेल्या फलकांवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची छबी दिमाखात झळकत असल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्यामदतीने मोठी बंडखोरी केली. तसेच, त्यांनी शिवसेना पक्षावरही दावा केला आहे. चाळीस आमदार आणि बारा खासदार सोबत असल्याचा हवाला देत आपणच खरी शिवसेना असल्याचे ठासून सांगत आहेत. एवढ्यावरच न थांबता पक्षचिन्ह धनुष्य बाणावरही हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या साऱ्याच मुद्द्यांवरून न्यायालयीन लढाई सुरु आहे. दरम्यानच्या काळात धनुष्य बाण हे चिन्ह गोठविले गेले तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेंबांची शिवसेना, असे दोन गट तयार तयार झाले.गोठविलेले पक्ष चिन्ह आणि पक्षाचे झालेले दोन तुकडे यामुळे सामान्य शिवसैनिक प्रचंड संपायला आहे. शिंदे गटाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे शिंदे गटाशी दोन हात करीत असून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. असे असताना स्थानिक पातळीवरील पदाधिकारी मात्र शिंदे गटाचा उदो-उदो करीत असल्याचे बाब समोर आली आहे.
गायकर या गेल्या पंचवार्षिकमध्ये नाशिक शहरात शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. एवढेच नाही तर युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखही आहेत. याच गायकर यांनी डीजीपी नगर तीन मध्ये खासदार गोडसे यांच्या निधीतून कॉलनी रस्त्यांचे काँक्रीटीकरणचे उदघाटन आणि सीसीटीव्हीही चे लोकार्पण हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता. त्यासाठी परिसरात फलकबाजीही करण्यात आली होती. या फलकावर गोडसे यांची छबी दिमाखात झळकत होती. यावरून खासदारांनी निधी उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे छायाचित्र लावले कि गायकर स्वतः शिंदे गटात प्रवेश करणार, असे मानायचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण काहीही असले तरी गायकर यांच्या कृतीने सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
Nashik Politics Shivsena Thackeray and Shinde Group Banner